मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या भेटीला राजभवनावर गेले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. या भेटीमध्ये सध्याच्या राजकीय पेचप्रसंगावर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव अजॉय मेहता, स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाली आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री राजभवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी गेले. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली.
विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र; आज निर्णय होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी परिषदेची निवड होणे आवश्यक आहे. कोरोना संकटानंतर या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. दरम्यान, राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व्हिडीओ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन दिली आहे.
काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाला केली आहे. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभागृह सदस्यत्वाचा पेच सुटणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा
राज्यपालांनंतर महाविकासघाडीतील तीन महत्वाचे घटक असलेले शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाने देखील एक सहा पानांचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले आहे. कोरोनाने निर्माण केलेली परिस्थिती मान्य आहे, पण काही काळजी घेवून निवडणूक घेणे शक्य करावे अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, काँग्रेसचे पत्र बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे पत्र एकनाथ शिंदे ह्यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला, राजभवनावर चर्चा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2020 09:02 AM (IST)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर करण्याची विनंती केंद्रीय आयोगाला केली आहे.
आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -