मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यपदाच्या नियुक्तीवरून राज्यात राजकारण तापत आहे. आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्रावरून निवडणूक आयोगाला राज्यातील विधानपरिषदेच्या रिक्त जागांवर निवडणूक घेण्याची शिफारस केली आहे. यामुळे विरोधी पक्षाच्या समन्वयातून राज्यासमोर उद्भवलेला संवैधनिक पेच, सुटण्याच्या मार्गावर असल्याची चिन्ह दिसत आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शेवटच्या ट्विटमध्ये संजय राऊत यांना राज्यपालांवर टीका करण्यावरून अप्रत्यक्ष टोला हाणला आहे.




फडणवीस यांनी ट्विट्मध्ये काय म्हंटलय?
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांच्या निवडणुका तातडीने घेण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (ECI) केली आहे. राज्यपालांच्या या निर्णयाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग केंद्रीय गृह मंत्रालयाशी सल्लामसलत शक्य तितक्या लवकर निवडणूक घेण्याचा निर्णय घेईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यामुळे कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र अस्थिरतेत जाण्यापासून दूर राहिल आणि आपल्या राज्यघटनेची मूल्ये देखील टिकवून ठेवता येईल, असं मत फडणवीस यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.





Coronavirus | राज्यात आज 583 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा आकडा 10,498




संजय राऊत यांच्यावर टीका
यातून एक बाब स्पष्ट झाली आहे की, लोकशाही प्रक्रियेत संवादातूनच मार्ग निघत असतो. संवैधानिक पद धारण केलेल्या व्यक्तीवर अकारण टीका करून कोणताही फायदा होत नाही, म्हणत फडणवीस यांनी संजय राऊत यांनी अप्रत्यक्ष टोला हाणला आहे. "कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठाम उभं राहायला पाहिजे. ही देशाची लढाई आहे, असंही शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. तसंच "विरोधी पक्षाला वाटत असेल की असं राजकारण करुन सत्तेच्या पिंडाला कावळा शिवेल, पण आता लॉकडाऊनमध्ये कावळेही नाहीत. अशा अड्ड्यावर बसून जर कोण पत्ते पिसत असेल तर पिसावेत," अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्याला आज देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.


Corona Cremation | मृत कोरोना रुग्णाचा अंत्यविधी 12 तासाच्या आत करावा, राज्य सरकारच्या सूचना