मुंबई : मुंबई शहरात कोरोना संसर्गाला रोखण्यात यश मिळत असेल तरी राज्याच्या इतर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. विशेषकरुन पुणे विभागात याचा प्रसार अधिक वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर येथीळ कोविड उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.


पश्चिम महाराष्ट्रात कोविडचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब. मुंबई-ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारे आहे. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा अशी मराठीत म्हण आहे. कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होऊ देऊ नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.


'ठाकरे आणि मोदींच्या कामाची पद्धत सारखीच, एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष' : संजय राऊत


इतर देश फक्त कोविड एके कोविडचा मुकाबला करताहेत. आपले तसे नाही. आपल्याकडे आता गणेशोत्सव, मोहरम पार पडला, आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पावसाला सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे असून हा कसोटीचा काळ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


प्रमुख मुद्दे :




  • सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा तर 15 दिवसांत चांगले परिणाम दिसतील. हे मुद्दे म्हणजे एकेका रुग्णांमागचे जास्तीत जास्त संपर्क शोधा, चेस दि व्हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूर्वक राबवा, कंटेनमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, चाचण्यांची संख्या वाढवा, घरोघर सर्व्हेक्षणाला अधिक गती द्या.

  • आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय सहायक यांच्या सहभागाने आपण संपूर्ण राज्यात घरोघर भेटी देऊन कुटुंबांच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल. यात घरातल्या कुणाला इतरही काही आजार आहेत का? त्यांचे आरोग्य कसे आहे? त्यांना न्युमोनियासदृश्य काही लक्षणं आहेत का? घरात बाहेरून कुणी व्यक्ती आल्या आहेत काय? मास्क व इतर शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते का याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल.

  • कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर राज्यात जन जागृती करण्याची गरज आहे. कारण ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा मोठा सहभाग होता तसाच कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे.

  • केवळ पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्याला या कोरोन लढ्यात काही अडचण आल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार. मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका.

  • कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल पण कायमस्वरूपी चेहऱ्याला मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत.

  • सुविधा उभारण्यात मदत केली जाईल, निधीही कमी पडू दिला जाणार नाही. मात्र, या सुविधा वापरायची वेळ येणार नाही इतक्या जबाबदारीने काम करा आणि कोरोनाला रोखा.

  • आपण अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरु केले आहेत. मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र, सावधानता बाळगावीच लागणार आहे.


Pune Lockdown | पुण्यातला लॉकडाऊन उठवायला मुख्यमंत्र्यांचा विरोध होता - संजय राऊत