मुंबई : मुंबईत वांद्रे किंवा कुर्ला स्थानकादरम्यान रिक्षा-बसची वाट पाहून कंटाळण्याचा अनुभव अनेकांना नेहमीच येत असतो. पण वाहतुकीची ही गैरसोय टाळण्यासाठी आता बेस्ट आणि ऑटोरिक्षा यांना वाहतुकीचा पर्याय म्हणजे युलू सायकलचा वापर प्रवाशांना उपलब्ध झाला आहे. नवी मुंबईनंतर आता बीकेसीमध्ये पर्यावरणास पुरक अशा ई-बाईकच्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोठी गर्दी टाळतच आपल्याला इच्छित स्थळी जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.


वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलात
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सातत्याने विविध प्रकल्प हाती घेत आहे. त्याचप्रमाणे, पर्यावरण प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून प्राधिकरण वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये सार्वजनिक सायकलचा उपक्रम सुरू केला आहे. या सेवेची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकरणाने युलू संस्थेसोबत दिनांक 31 जानेवारी 2020 मध्ये सामंजस्य करारनामा साक्षांकित केला आहे. या सेवेमुळे वांद्रे आणि कुर्ला उपनगरीय रेल्वे स्थानक वांद्रे-कुर्ला संकुलास एका आधुनिक, पर्यावरण पूरक, इंजिन विरहित पद्धतीने जोडण्यात आला आहे. सुरुवातीस अठरा स्थानके करण्यात आली असून वांद्रे रेल्वे स्थानकाच्या सर्वात जवळचे स्थानक एसआरए इमारतीजवळ आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार सदर स्थानकांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल.



युलू सायकल वापराचे दर


यूलू सायकलचा वापर करण्यासाठी सुरुवातीला 5 रुपये हा अन-लॉकिंग शुल्क दर म्हणून आकारला जाईल. त्यानंतरचा वापर करण्यासाठी प्रत्येक मिनिटांसाठी रुपये दीड याप्रमाणे दर आकारण्यात येईल. या सेवेमध्ये प्रतिमहिना रिचार्ज सुविधा उपलब्ध असून 20 ते 100 टक्के प्रमाणे सूटसुद्धा युलू संस्थेमार्फत देण्यात येईल.



कोरोनाचा पार्श्वभूमीवर युलूमार्फत सायकल्स पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात येत आहेत. याबाबतीत योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. प्रस्तावित सार्वजनिक सायकल सेवा ही फेब्रुवारी 2020 मध्ये चालू करण्याचे प्रस्तावित होते पण कोविड -19 परिस्थितीमुळे सदर सेवेची सुरुवात दिनांक 31 ऑगस्ट, 2020 पासून सुरु झाली असून सार्वजनिक सायकल शेअरिंग सेवेचा लाभ घेण्यास प्राधिकरणामार्फत आवाहन करण्यात आले आहे.