मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधक महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आले. कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. कर्जमाफी हा प्रथमोपचार आहे. मी हे नेहमीच सांगत आलो आहे. जो आता आपण करतो आहोत. मात्र शेतकरी त्याच्या पायावर उभा कसा राहील असा आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यासाठी शेतीमध्ये नवीन प्रयोग कसे करता येतील, कमी जागेत जास्त पीक कसं घेता येईल, ते पीक आल्यानंतर त्याला योग्य भाव कसा मिळवून दिला जाईल, मग त्याचं मार्केटिंग कसं केलं जाईल ही संपूर्ण चेन असायला हवी, त्याची आखणी केली गेली पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सामना वृत्तपत्रासाठी संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते.


विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण काही केलं तरी विरोधी पक्ष बोंबलणारच. आता आपण पीक कर्जाबद्दल बोलतो आहोत त्याला गेल्या सरकारने दीड लाखाची कर्जमाफी योजना जाहीर केली होती, ती अद्याप चालू होती. ही योजना मी दीड लाखावरुन दोन लाखांवर नेली आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या अधिवेशनात ही योजना जाहीर केली. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी जानेवारी, फेब्रुवारी हे दोन महिने मी मागून घेतले आणि मला संपूर्ण शेतकरी, जे माझे बांधव आहेत त्यांना धन्यवाद द्यायचेत की, दोन महिने मी मागून घेतल्यानंतर त्यातल्या कोणीही त्याबद्दल तक्रार केली नाही.


दोन लाखांपर्यंत कर्ज माफ होणार


दोन महिन्यांनंतर आपली कर्जमुक्ती होईल याची त्यांना खात्री आणि विश्वास आहे. मी शब्द दिल्याप्रमाणे मार्चमध्ये ही योजना सुरु होईल. दोन लाखांपर्यंत ज्याचं पीक कर्ज आहे, ते पूर्ण माफ होणार आहे. म्हणजे त्याचा दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जाचा सातबारा आहे त्यावरून त्याचं पीक कर्ज काढलं जाणार आहे. दोन लाखांच्या वरचे जे कर्जदार आहेत किंवा कर्ज ज्यांनी घेतलेलं आहे, त्यांच्यासाठी आणि जे नियमित कर्ज परतफेड करताहेत त्यांच्यासाठीसुद्धा आपण योजना लवकरच जाहीर करुन ती अमलात आणू, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं.


आधी कोल्हापूर पूरग्रस्थांना मदतनिधी द्या


कोल्हापूरमध्ये कुणी मोर्चा काढत असतील तर आनंद आहे. मात्र त्याच भाजपला मला सांगायचंय की, सातबारा कोरा करणं बाजूल ठेवा, आधी अवकाळी पाऊस झाला आणि पूरही आला होता, केंद्र सरकारकडून येणारे मदतीचे पैसे तिथे लोकांना अजून मिळाले नाहीत. ते मिळवण्यासाठीसुद्धा मोर्चा काढा. तोही प्रश्न खरं तर त्यांनी हाती घ्यायला हवा. नुसता विरोधासाठी विरोध करू नका, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला. केंद्र सरकार नेमक्या कोणत्या दिशेने जाऊ इच्छिते हे मलाच काय, तर केंद्र सरकारला देखील कळतंय की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. सगळाच गोंधळ सुरू आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


संबंधित बातम्या