21 फेब्रुवारीपासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध होणार
मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, हे सरकार सत्तेवर आल्यावर महिन्याभराच्या आत कर्जमुक्ती योजनेचे धाडसी पाऊल उचलले आहे. 21 फेब्रुवारीपासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यावेळी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होईल. अशा वेळी प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगली वागणूक द्यावी. त्याच्याशी सौजन्याने वागा. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्याची तक्रार स्थानिक पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
कर्जमुक्तीची देशातली सर्वात मोठी योजना
ही कर्जमुक्त राबवितांना शेतकऱ्यावर आपण उपकार करतोय या भावनेतून काम करू नका असे स्पष्ट करतानाच शेतकरी शासनाकडे आशेने पाहतोय त्याचे समाधान करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही योजना डिसेंबरमध्ये जाहिर केली आणि तिची अंमलबजावणी मार्चपासून करू असा शब्द शेतकऱ्याला दिला आहे. शेतकऱ्याने आतापर्यंत जो विश्वास दाखविला आहे त्याला तडा जाऊ देवू नका, असे आवाहन करतानाच कर्जमुक्तीची ही देशातली सर्वात मोठी योजना असल्याचे सांगून संपूर्ण देशाचे आपल्याकडे लक्ष आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जिल्हा यंत्रणेला सांगितले.
15 एप्रिलपर्यंत योजना पूर्ण करावी
आताच्या काळापुरती ही योजना आहे. जिल्हा यंत्रणेने 31 मार्चपूर्वी ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. जास्तीत जास्त 15 एप्रिलपर्यंत योजना पूर्ण झाली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले. दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या आणि त्यावर तात्काळ तेथेच उपाय शोधा. शेतकऱ्यांशी चांगले वागा. त्यांची शासनाबद्दल नाराजी राहणार नाही याची काळजी घ्या. आतापर्यंत योजनेचं काम अल्पावधीत व्यवस्थित झाले आहे त्यात सातत्य ठेवा, असे निर्देशही पवार यांनी यावेळी दिले.
पोर्टलवर 88 टक्के डाटा अपलोड
दरम्यान, कर्जमुक्ती योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर 88 टक्के डाटा अपलोड करण्यात आला आहे. सुमारे 36.41 लाख शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांपर्यत पीक कर्ज घेतले आहे. त्यापैकी 32 लाख 16 हजार 278 शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली आहे.
कर्जखात्याशी आधार जोडणीचे प्रमाण 95 टक्के
अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, जळगाव, जालना, नांदेड, नाशिक, परभणी, रायगड या जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांची एक लाखांपेक्षा जास्त संख्या आहे. कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडणीचे प्रमाण 95 टक्के आहे. त्यामध्ये व्यापारी बॅंकांचे 65.53 टक्के तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचे प्रमाण 63.96 टक्के आहे.
आधारक्रमांकाचे प्रमाणीकरणाची सोय आपले सरकार सेवा केंद्र, बॅंका आणि स्वस्त धान्य दुकांनामध्ये करण्यात आली आहे. दि. 21 फेब्रुवारी रोजी पोर्टलवर याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर या गावनिहाय याद्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गावात चावडीवर लावण्यात येतील. जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय समिती गठीत करतील.
95 हजार 769 केंद्रावर प्रमाणीकरणाची सुविधा
आधार प्रमाणीकरणासाठी राज्यभरात 8 हजार 184 केंद्र बॅंकांमध्ये सुरू करण्यात येतील. 26 हजार 770 आपले सेवा केंद्र, 8 हजार 815 सामाईक सुविधा केंद्र आणि 52 हजार स्वस्त धान्य दुकान अशा 95 हजार 769 केंद्रावर प्रमाणीकरणाची सुविधा आहे.