Mumbai: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज गिरगांव चौपाटीवरील "दर्शक गॅलरी"चे लोकार्पण करण्यात आले आहे. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, रश्मी ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यसह अनेक मोठे नेते उपस्थित होते. 


गिरगांव चौपाटीच्या उत्तर टोकाला वाळकेश्वर मार्ग व कवीवर्य भा.रा. तांबे चौकालगत ही गॅलरी उभी करण्यात आली आहे. पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनीवर सुमारे 475 चौ.मि. आकाराचा ‘व्ह्यूइंग डेक’ - दर्शक गॅलरी उभारण्यात आली आहे. या ठिकाणावरून अरबी समुद्राचे, गिरगांव चौपाटीचे व क्विन्स नेकलेस, अशी ओळख असणाऱ्या मरीन ड्राईव्हच्या विहंगम दृश्याचा अनुभव घेता येणार आहे. हा डेक समुद्राच्या लाटांची ऊंची, दाब आदी सर्व बाबींचा तांत्रिक दृष्टीकोन अभ्यास करुन त्याअनुरुप उभारण्यात आला आहे.


'दर्शक गॅलरी' अर्थात सदर 'व्ह्यूइंग डेक'वर एकाच वेळेस किमान 500 पर्यटकांना सागरी सौंदर्य न्याहाळता येणार आहे. तसेच 'नेताजी सुभाष मार्ग' अर्थात राणीच्या रत्नहाराप्रमाणे दिसणाऱ्या 'मरिन ड्राईव्ह'चे विहंगम दृश्य हे डोळ्याचे पारणे फेडणारे असणार आहे.  या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व संबंधित परवानग्या प्राप्त करून हा प्रकल्प मूळ कालावधी 12 महिन्यांचा असून सुद्धा फक्त 8 महिन्यातच हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. येथे विश्रांतीसाठी कल्पकतेने आसने मांडण्यात आली असून या ठिकाणी फुल झाडांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: