मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरुन शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. यावर चर्चेसाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करणार असल्याची माहिती आहे.


उद्धव ठाकरे आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यात नाणारवर मध्यस्थीसाठी पुढील काही दिवसात हालचाली होण्याची शक्यता आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी उद्धव ठाकरेंकडे भेटीसाठी वेळ मागितली होती, पण वेळ देण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिला होता.

धर्मेंद्र प्रधान आणि फडवणीस यांच्यात आज नाणार विषयावर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली.

केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, कंपनीचे पदाधिकारी, पर्यावरणवादी, तज्ञ आणि शिवसेना, भाजपचे प्रतिनिधी यांची समिती स्थापन करून चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाणार प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप, गैरसमजुती, जमीन अधिग्रहण प्रक्रिया याबाबत चर्चेसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.

नाणार प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षरी

‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या प्रकल्पाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर  आणि संयुक्त अरब अमीरात (युएई) चे राज्यमंत्री आणि एडनॉक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी धर्मेंद्र प्रधान आणि युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर झाला.

प्रस्तावित नाणार प्रकल्पाची वैशिष्ट्य

जगातील सर्वात मोठा रिफायनरी कम पेट्रोकेमिकल प्रकल्प

जवळपास 2.90 लाख कोटी रुपयांची योजना

वर्षाला सहा कोटी टन उत्पादन करण्याची क्षमता

पहिली गुंतवणूकदार सौदी अरामको जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी

दुसरी गुंतवणूकदार एडनॉक अबूधाबीतील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी

भारतात एवढी मोठी गुंतवणूक कशामुळे?

इतर तेल उत्पादक कंपन्यांप्रमाणेच एडनॉक आणि सौदी अरामकोलाही भारतात आपली पकड मजबूत करण्याची इच्छा आहे. भारत जगातील सर्वात मोठा तिसरा इंधनाची गरज असणारा देश असून एकूण गरजेपैकी 80 टक्के तेलाची आयात केली जाते. 2016-17 पर्यंत सौदी अरेबिया भारताचा सर्वात मोठा क्रूड ऑईल पुरवठादार देश होता, मात्र गेल्या वर्षी इराकने सौदीची जागा घेतली.