मुंबई : घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील चार जण आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. या विमानात पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता.  या चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला.


पायलट मारिया झुबेरी, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे यांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला.

चाचणीसाठी दुपारी दीडच्या सुमारास जुहू हेलिपॅडवरुन या विमानाने उड्डाण केलं. मात्र घाटकोपरपर्यंत पोहोचताच दुर्घटनाग्रस्त झालं आणि भर वस्तीत कोसळलं.

दरम्यान, या घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. खराब हवामान असतानाही कंपनीने उड्डाणासाठी आग्रह केला, अशी माहिती दावा मारिया यांचे पती प्रभात कथुरिया यांनी दिली आहे. मारिया आणि प्रदीप राजपूत यांनी खराब हवामान असल्याचं सांगितलं. मात्र कंपनीने आग्रह केला, असं प्रभात यांनी सांगितलं.

कोण आहेत मारिया झुबेरी?

28 डिसेंबर 1970 साली जन्मलेल्या आणि मूळच्या अलाहाबादच्या असलेल्या मारिया झुबेरी यांचा विवाह प्रभात कथुरिया यांच्यासोबत झाला. त्यांना एक 15 वर्षांची मुलगी आहे. पतीसह सध्या त्या मीरा रोड येथे राहतात. त्यांना एक 15 वर्षांची मुलगी आहे.

मारिया यांच्याकडे एक हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे. खराब हवामान असल्याचं सांगूनही कंपनीने चाचणी करण्याचा आग्रह धरला. यासाठी मारिया यांनी सकाळी 8 वाजताच घर सोडलं.

प्रभात यांनी दुपारी एक वाजताच Where r u ? असा मेसेज केला होता. पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने प्रभात यांच्या मनात शंका निर्माण झाली आणि भीती वाटू लागली. अखेर अपघाताची बातमी त्यांनी टीव्हीवरच पाहिली.

दुर्घटनाग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 हे चार्टर्ड विमान यूपी सरकारचं खासगी विमान होतं. मात्र हे विमान 2014 मध्ये यूपी सरकारकडून यूवाय एव्हिएशन या कंपनीने विकत घेतलं होतं.