Eknath Shinde Maharashtra Tour : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पहिल्यांदाच राज्यभर दौरा होणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा दौरा 30 तारखेपासून सुरु होत आहे. हा दौरा 30 जुलै, 31 जुलै आणि 2 ऑगस्ट तारखेला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात दौरा करणार आहेत. याबाबत शिंदे गटातील आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री औरंगाबाद, सिल्लोड, येवला, वैजापूर पुणे या भागात स्थानिक पातळीवरचे प्रश्न ऐकून, सर्व घटकातील समस्या आणि निवेदनादेखील स्वीकारणार आहेत. मुख्यमंत्री हे आधी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत आढावा घेतील. याचप्रमाणे विकास कामातील आढावा,कार्यकर्ता मेळावा होणार आहे.


तो शिंदे गटाचा मेळावा नसेल : उदय सामंत
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अब्दुल सत्तार यांच्या भागात मेळावा होणार आहे. संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री मुक्काम करतील. एकनाथ शिंदे विकासकामांची पाहणी करणार आहेत. या सर्व दौऱ्यासंदर्भात शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. शिंदेंचा दौरा होणार यावेळी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर उदय सामंत म्हणाले की, अनेक ठिकाणी शिवसेनेचा मेळावा होणार आहे हा शिंदे गटाचा मेळावा नसेल. त्यामुळे संघर्ष करण्याची गरज नाही. हा दौरा फक्त शिंदे गटातील आमदारांच्या भागात नाही तर पुढे सर्वत्र आहे. कोणत्याही आमदारांच्या भागात विकासकाम केली याचा फायदा महाराष्ट्रालाच होणार आहे.


मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती : उदय सामंत
पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी पुढे सांगितले की, "मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री नियुक्त होतील. कोणतंही काम थांबलेलं नाही. तसेच राज्यात आता जे निर्णय घेतले जात आहेत, ते राज्याच्या हिताचे निर्णय आहेत. विरोधी पक्षाने फिरु नये असं नाही. त्यांनी केलेल्या सूचनांचा विचार सरकार करेल. तसेच आम्ही शिवसेनेतच आहोत. लीलाधर डाके यांनी शिवसेनेत योगदान दिलं आहे. त्यांना जाऊन भेटणं हे राजकीय संस्कृतीचा भाग आहे. गट वाढवण्यासाठी या गाठीभेटी नाहीत. हा संस्कृतीचा भाग आहे. आशीर्वाद घेतला पाहिजे."