CM Eknath Shinde : मिठी नदी (Mithi River) आणि विमानतळ प्राधिकरणबाधितांना हक्काची घरे मिळाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते मिठी नदी आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील प्रकल्प बाधित क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील झोपडीधारकांचे एचडीआयएल संकुल, कुर्ला येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. या रहिवाशांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सदनिका चावी वाटप करण्यात आली. चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील बाधित झोपडीधारकांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले. 


मिठी नदी आणि विमानतळ प्राधिकरणबाधितांना हक्काचं घर


26 जुलै 2005 रोजी महाप्रलयंकारी अतिवृष्टीमध्ये क्रांतीनगर आणि संदेशनगर हे विभाग संपूर्ण पाण्याखाली गेले होते. त्यानंतर 2008-2009 मध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी एचडीआयएल संकुल उभारण्यात आले. पण, गेले 15 वर्षांपासून हे नागरिक घराच्या प्रतीक्षेत होते. दरवर्षी पावसाळ्यात घरात चार-पाच फूट पाणी भरत असल्याने नेहमीच वित्तीयहानी होत होती. त्यामुळे स्थानिक नागरिक हवालदिल झाले होते. मात्र, आता ही प्रतीक्षा संपत असून 1500 कुटुंबांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हक्काचे घर मिळाले आहे. यावेळी आमदार लांडे यांनी सहकुटुंब पाया पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी सदनिका वाटप


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी भाषणात म्हटलं की, 'बाळासाहेबांनी झोपडी धारकांना घरे देण्याची घोषणा केली होती, अनेकांना अशक्य वाटत होते. पण, आपण पाहतो आहे, अनेक निर्णय घेतो आहे, अधिवेशनात एकदा आमदार लांडे बोलताना रडायला लागले. संवेदनशील आमदार आहेत. मुलाची पर्वा न करता नागरिकांची पर्वा केली. अशा घटना पाहायला मिळत नाही. मी महाराष्ट्र माझा कुटुंब असल्याचे समजतो. तसे, मामा तुम्हाला कुटुंब समजतात, 'माझे कुटुंब, माझा परिवार' इतके आपल्याला राहात नाही. आधी आपण 85 कोटी इथे मंजूर केले. सरकार सर्व सामन्यांचे आहे 220 लोकांना आधी घरे दिली. आता 1261 लोकांना घरे देत आहोत, इथे जात-पात काही नाही, सगळे एकत्र राहतात. हॉस्पिटलला आपण 500 कोटी दिले. काम सुरु झाले आहे, हे वेगवान निर्णय घेणारे सरकार आहे.' 


मुंबईत पुढे एकही खड्डा दिसणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन


मुंबईत पुढे एक ही खड्डा दिसणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, मुंबईत पुढे एक ही खड्डा दिसणार नाही. कशाला खर्च करीत होते. काळे-पांढरे करीत होते, पोटदुखी झाली आहे. काही लोकांना, त्यांच्यासाठी आपला दवाखाना केला आहे. मुंबईत अनेक विकासाची कामे करीत आहे, जगभरातून लोक येतात. अनेक लोक मुंबई बाहेर फेकले गेले, त्यांचे प्रकल्प रखडले आहे. त्यांचे प्रकल्प मार्गी लावण्याचे काम विविध यंत्रणा करीत आहे. मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईरकांना परत आणण्याचे काम करीत आहे. मेट्रोचे प्रकल्प रखडले होते, ट्राफिक वाढली होती, त्यांचे काम केले. खूप मोठे प्रकल्प होत आहेत, ज्यांना घरे मिळत आहेत, त्यांना शुभेच्छा सोसायटी स्वछ, सुंदर ठेवण्याची अपेक्षा आहे. आपल्या मतदार संघात कोणते ही काम राहणार नाही, चहल यांना सांगितले होते. जास्त पैसे द्या माहुल वसियांना 1500 घरे लवकरच मिळतील.