ठाणे : शिवसेनेशी मतभेद आहेत. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही वेगळे पक्ष आहेत, त्यामुळे मतभेद असणं साहजिक आहे. मात्र युतीची काळजी कार्यकर्त्यांनी करु नये, त्याबाबत पदाधिकारी पाहतील. सैनिकाचं काम लढाई करण्याचं, शत्रू कोण हे पाहू नका, तयारीला लागा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.

ठाण्यात भाजप कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. त्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

देव, देश आणि धर्मासाठी लढा, असा शिवछत्रपतींचा मावळ्यांना आदेश होता. रयतेचं राज्य आणण्यासाठी शिवरायांनी कोणतीही कसर सोडली नाही. मोदींनाही रयतेचं राज्य हवं आहे. त्यासाठी कामाला लागा, असं मुख्यमंत्री म्हणाले.

"सत्तेसाठी युती नाही, अजेंड्यासाठी युती आहे.


केवळ सीट शेअरिंग नाही. पारदर्शी कारभारासाठी युती असेल.


युती होणार असेल तर ती सामान्य माणसासाठी झाली पाहिजे",


असं मुख्यमंत्री म्हणाले.


युतीची काळजी करु नका, सैनिकाचं काम लढाई करण्याचं, शत्रू कोण हे पाहू नका. शिवाजी महाराजांना सेनापती महत्त्वाचे होते, तसेच मावळेही, कारण प्रत्यक्ष लढाईत मावळेच उतरतात. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी बूथचा कार्यकर्ता हा आपला मावळा आहे, हे समजून कामाला लागावं, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.

त्यांना तिकीट नाही

"नेत्यांच्या आवतीभिवती फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार नाही.


जनतेच्या भोवती फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल",


असं मुख्यमंत्री म्हणाले.


आव्हानांचं रुपांतर संधीत करा हा पंतप्रधान मोदींचा सल्ला आहे. मोदींनी जनतेला विश्वास दिला, तोच विश्वास आम्ही राज्यात आतापर्यंत दोन वर्ष टिकवला. भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल जनतेचे आभार. पण मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नका, जबाबदारी वाढली आहे. यापेक्षा जास्त काम करावं लागणार आहे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.

4 हजार गावं दुष्काळमुक्त

दोन वर्षात 4 हजार गावं दुष्काळमुक्त केली. दुष्काळ, रिकामी असलेली तिजोरी, पाणी नाही, अशा संकटांना विश्वासाने सामोरे गेलो. आव्हानांचं संधीत रूपांतर केलं. दोन वर्षे दुष्काळाशी झगडलो, जलयुक्त शिवार राबवलं. 4000 गावं दुष्काळमुक्त केली, असं मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या 15 वर्षात कोणत्या सरकारने समाजाच्या प्रश्नाबाबत इतकी सकारात्मकता दाखवली? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

नोटाबंदी ही काळ्यापैशाविरोधात लढाई

पंतप्रधान मोदींनी नोटबंदी केली, ही काळ्या पैशाविरोधातील लढाई आहे. देशातील, महाराष्ट्रातील जनतेने या निर्णयाला समर्थन दिलं. मोदीजी अभिनंदनास पात्र आहेत, राजकीय आयुष्य पणाला लावून देशहितासाठी निर्णय घेतला. पण महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन, त्यांनी पाठिंबा दिला. गरीब, मध्यमवर्गीय रांगेत उभा होता, त्रास होतोय पण निर्णयाला पाठिंबा दिला असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

मराठा समाजाने शिस्तबद्ध आंदोलन  केलं. सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रत्येक मागणीवर कारवाई केली.

मागेल त्या शेतकऱ्याला कृषीपंप देणार

आघाडी सरकारने शेतकऱ्याला वीजबिलासाठी रांगेत उभं केलं. 2012 ला महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त होईल असा फसवा विश्वास दाखवला. मात्र आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी सोलर फिडर आणलं. जून 2017 पर्यंत मागेल त्या शेतकऱ्यालाकृषीपंप देण्याची तयारी आमच्या सरकारने केली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

आमच्या सरकारने विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराज फी सवलत दिली. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांने नामांकित शाळेत शिकावं म्हणून प्रयत्न केले.शिक्षणाचं व्यापारीकरणं झालं म्हणून असंतोष झाला. आम्ही 'सारथी' इन्स्टिट्यूट तयार करत आहोत. भाषण नाही तर कृती केली. दीड लाख शेतकऱ्यांच्या मुलांना स्किल डेव्हलप करण्यास सुरुवात केली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आम्हाला राजकारण करायचं नाही सगळ्या समाजानं पुढे घेऊन जायचं आहे. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्याचं फडणवीसांनी नमूद केलं.

सगळ्यांना कळलं हे सरकार समाजकारण करतं म्हणून जनतेने नगरपालिकेत भाजपला यश मिळालं. ही सुरुवात आहे. मात्र या यशाने हुरळून जाऊ नका, जबाबदारी वाढली, यापेक्षा जास्त काम करावं लागणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

शेतकऱ्यांना मदत

शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी योजना आणाव्या लागतील. सिंचन घोटाळा झाला, तरी केंद्राकडून राज्याला 25 हजार कोटी रुपये सिंचनासाठी मिळणार आहेत. विदर्भ, मराठवाडा प्रकल्पांना चालना देण्याचं काम होणार. शेतकऱ्यांना सोलर फिडर आम्ही देणार आहोत. त्यामुळे दिवसाला 12 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ वीज मिळेल. विदर्भ, मराठवाड्यात पावणे दोन लाख कनेक्शन दिले. आधीच्या सरकारने राज्याला लोडशेडिंग मुक्त केलं नाही.  2017 मध्ये शेतकरी मागेल तेव्हा कृषी पंप देऊ.

17 हजार डिजिटल शाळा

राज्यात 17 हजार शाळा डिजिटल केल्या.इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थी पुन्हा मराठी शाळांकडे वळले त्यासाठी शिक्षणमंत्र्यांचं आभार.

पुरोगामी महाराष्ट्र मागे होता तो तिसऱ्या क्रमांकावर आला. आपण पहिल्या क्रमांकपर्यंत पोहचू. डिसेंबर 2018 मध्ये प्रत्येक गाव स्मार्ट करु, प्रत्येक गावात कनेक्टिव्हिटी असेल.

स्मार्ट शहरं

शहर बदलली पाहिजेत, 10 शहरं स्मार्ट करायचं ठरवलं आहे. मुंबईत CCTV सुरु केली.  मुंबईत देशातील पहिलं वाय फाय शहर आम्ही करुन दाखवलं. मुंबई हे मानाचं शहर. पुणे,ठाणे, नागपूर,नाशिक या शहरांतही वाय-फाय सुरु करु.