मुंबई: "शेतकरी कर्जमाफीसाठी 77 ते 80 लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्यापासून प्रत्यक्ष कर्जमाफीला सुरुवात होणार आहे. उद्या 10 लाखांपेक्षा जास्त शेतकऱयांना लाभ मिळणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे बँका कर्जमाफीचे पैसे लाटूच शकणार नाहीत", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी, एसटी-बेस्टचा संप, सोशल मीडिया अशा विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.

उद्यापासून कर्जमाफी

मुख्यमंत्री म्हणाले, “उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. उद्या 10 लाखांपेक्षा जास्त शेतकऱयांना लाभ मिळेल. पुढे दररोज 2 ते 5 लाख खाती सेटल करु. मग  25 ते 30 दिवसात 80 टक्के प्रक्रिया पूर्ण होईल. उर्वरित 20 टक्के शेतकऱ्यांच्या अर्जात ज्या त्रुटी आहेत, त्याची सुनावणी होईल”

बँकांच्या गंडवागंडवीला चाप

ऑनलाईन प्रक्रियेमुळे बँका मागच्यावेळेप्रमाणे यंदा कर्जमाफीचे पैसे लाटू शकणार नाहीत. पूर्वी बँका राईट ऑफ केलेली खाती दाखवत आणि कर्जमाफीचे पैसे घेत असत, मात्र ते आता शक्य होणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

याशिवाय मुंबईत जे खरे शेतकरी आहेत त्यांनाच कर्जमाफी मिळेल, खोट्या शेतकऱ्यांना मिळणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं.

इंधन दरकपातीमुळे तूट

पेट्रोल- डिझेलच्या किमती कमी केल्याने 3 हजार कोटींची तूट सहन करावी लागणार आहे. मात्र महसूल वाढवण्यासाठी काही नवीन उपाय योजना करत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

एल्फिन्स्टन आणि यवतमाळ दुर्घटना

एल्फिन्स्टनमध्ये दुर्घटना झाली त्याचा थेट संबंध सरकारशी आहे, पण यवतमाळमधली दुर्घटना थेट सरकारशी संबंधित नाही. पण त्या सरकारने त्याबाबत नियमन करायला हवं या मताचा मी आहे. म्हणून दोन्ही घटनेतील लोकांना मदत वेगवेगळी. कोणताही दुजाभाव नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सुप्रिया सुळेंना टोमणा

कोपर्डी बलात्कार खटल्याचा निकाल 1 जानेवारीपर्यंत लावा अन्यथा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.

मी राज्यात त्यांच्या ( सुप्रिया सुळे) भरवशावर फिरत नाही, तर जनतेच्या भरवशावर फिरतो. अशी वक्तव्य केल्यामुळे आरोपीला फायदा होतो. खटल्याचा निर्णय लावणं आमच्या हातात नाही, न्यायालयाच्या आहेत.  खोट्या राजकीय फायद्यासाठी असं वक्तव्य करणं योग्य नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मनसे नगरसेवक फोडाफोडी

काही गोष्टी राजकारणात बोलायच्या असतात, काही बोलायच्या नसतात. यापुढे आमची प्रत्येक हालचालींवर नजर असेल. पैसे देऊन नगरसेवक फोडले, या किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांची चौकशी ACB करेल. त्यांनी मला वेळ मागीतली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबई विद्यापीठ घोळ

निकालाबाबत जे झालं ते वाईट झालं यात शंका नाही, मात्र याआधी मॅन्युएल पेपर तपासणी कोण करायचं, काय त्रुटी होत्या हे समोर आले आहे. पण ऑनलाइन पेअर तपासणी रद्द होणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

एसटी आणि बेस्ट संप

एसटी कर्मचारी आमच्याशी चर्चा करतील आणि संप मागे घेतील. चर्चेतून तोडगा काढू.  बेस्ट कर्मचारी संपात गरज पडल्यास मी स्वत: हस्तक्षेप करेन, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

सोशल मीडिया

सध्या सोशल मीडिया आता मुख्य मीडिया झालेलं आहे. सरकारच्या सकारात्मक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर एजन्सीला काम केलं तर काय बिघडलं, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

...त्यांनाच नोटीस

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या फेक अकाउंटच्या लोकांनाच नोटिसेस पाठवल्या आहेत. त्या कोर्टात मांडल्या आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

...म्हणून पोलिसाला नोटीस

अहमदनगरचा कॉन्स्टेबल हा एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याचा भाऊ आहे. हा पोलीस दोन महिने प्रचार करत होता. त्याचे पुरावे आहेत. पोलीस जर प्रचारात उतरुन सरकारच्या विरोधात लिहायला लागले, तर कायदा सुव्यवस्था उरणार नाही, त्यामुळे त्या पोलिसाला नोटीस पाठवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.