सरकारची आयडिया, खाण्यास अयोग्य बर्फाचा रंग बदलणार!
एबीपी माझा वेब टीम | 17 Oct 2017 09:04 AM (IST)
दूषित बर्फावर उपाय म्हणून प्रशासनाने खाण्यासाठी अयोग्य असलेल्या बर्फाचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई: रस्त्यावरील-फेरीवाल्यांकडील थंड पेयांमधील बर्फाचे नमुने दूषित आढळल्यानंतर, आता अन्न आणि औषध प्रशासनाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दूषित बर्फावर उपाय म्हणून प्रशासनाने खाण्यासाठी अयोग्य असलेल्या बर्फाचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे खाण्यास अयोग्य असलेल्या बर्फाला निळा रंग देण्यात येणार आहे. जेणेकरुन असा बर्फ थंडपेयात वापरला जाऊ नये, तसंच जर तो वापरला असेल, तर ते तातडीने लक्षात यावं, हा त्यामागचा हेतू आहे. यावर्षी मे महिन्यात मुंबई शहर आणि उपनगरात गॅस्ट्रोच्या साथीनं थैमान घातलं होतं. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं पाहणी करुन, रस्त्यावरील बर्फाचे 74 टक्के नमुने दूषित असल्याचं उघड केलं होतं. यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने अशा बर्फाला प्रतिबंध म्हणून त्याचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबातचा प्रस्ताव सरकारला देण्यात आला आहे, सरकारने जर त्याला हिरवा कंदील दिला, तर राज्यभरात हे लागू केलं जाईल, असं अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात येत आहे.