नवी मुंबई : हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईत सिडकोने येत्या काळात अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी बंपर लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. दसऱ्यापर्यंत सिडको 15 हजार घरांची लॉटरी काढणार आहे.
सर्वसामान्यांसाठी घरांची निमिर्ती करणाऱ्या सिडकोच्या घर बांधणीचा वेग मंदावला होता. मात्र सिडको पाच वर्षात तब्बल 52 हजार घरांची उभारणी करणार आहे. शिवाय पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरं पूर्ण करण्यात येणार असून दसऱ्यापर्यंत लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे.
नवी मुंबईतील खारघर, तळोजा, घणसोली आणि द्रोणागिरी या भागात सिडकोकडून या घरांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये तळोजा येथे सध्या 10 हजार घरांची उभारणी सुरु आहे. या वर्षा अखेरपर्यंत इमारती बांधून तयार होणार आहेत.
बिल्डरपेक्षा सिडकोकडून कमी दरात घर उपलब्घ होत असल्याने सर्वसामान्य सिडकोच्या लॉटरीची वाट पाहत असतात. त्यामुळे नवी मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दसऱ्यापर्यंत लॉटरी काढण्याचं आश्वासन सिडकोने दिलं आहे.