नवी मुंबई : कोरोना काळात आपला जीव मुठीत घालून, घरदार वाऱ्यावर सोडून सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांच्या गळ्यात सिडकोने महागडी घरे मारली आहेत. 2018 साली विकलेल्या घरांच्या किंमतीत 3 लाखांपर्यंत वाढ करून पोलीस बांधवांना विकली आहे. या विरोधात आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून घरांच्या किंमती कमी न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.


कोरोना काळात पोलीस विभागाने केलेल्या कामाचे कौतुक करीत त्यांना थोडाफार दिलासा देता यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईत पोलिसांसाठी घरे घोषीत केली होती. सिडकोने दोन वर्षांपूर्वी घोषीत केलेल्या 15 हजार घरांमधील 4600 घरे बाकी होती. सिडकोकडे राहिलेली घरांची लॉटरी उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त घोषीत केली होती. यानुसार सिडकोने पोलिसांसाठी घरांची लॉटरी काढली असली तरी प्रत्यक्षात महागडी घरे पोलिसांच्या गळ्यात मारण्याचे काम सिडकोने केले असल्याचा आरोप पोलीस बांधवांच्या नातेवाईकांनी केली आहे.


घणसोली, खारघर, तळोजा, रसायनी, द्रोणागिरी भागात सिडकोने उभारलेल्या गृहप्रकल्पात पोलीसांना घरे देण्यात आली आहेत. 2018 साली विकलेल्या या घरांच्या किंमती पेक्षा 2.5 ते 3 लाख रूपये वाढवून पोलिसांना सिडकोने दिली आहेत. 2018 मध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 18 लाख ते 18 लाख 55 हजार होती. मात्र, तिच घरे आता पोलिसांना विकताना त्यांची किंमत 20 लाख 10 हजार ते 21 लाख 60 हजार अशी वसूल केली जात आहे. दुसरीकडे अल्प उत्पन्न घराची किंमत 2018 ला 25 लाख 6 हजार होती. ती आता 28 लाख 45 हजार करण्यात आली आहे. सरकार एकीकडे पोलिसांना घरे देवून आनंद देत असतानाच दुसरीकडे किंमती वाढवून आनंदावर विरजन घालत असल्याचा आरोप पोलीस नातेवाईक करीत आहेत. सरकारने उलट कोरोना योध्द्यांना स्वस्तात घरे द्यायला पाहिजे होते, अशी मागणी सरकारकडे केली आहे.


स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस लोकांसाठी झटणाऱ्या पोलिसांना राज्य सरकार घरे देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. एकीकडे सरकार पोलिसांचे कौतुक करीत असताना दुसरीकडे मात्र त्यांना महागडी घरे देत असल्याने पोलिसांप्रती त्यांचे प्रेम बेगडी आहे. सिडकोने पोलिसांना दिलेल्या घरांच्या किंमती कमी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.