विरार : मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून संबोधलं जातं. पण याच मुंबई जवळच्या आदिवासी भागात शिक्षणाची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. मुंबई जवळच्या विरारमधील तिल्हेरा गावात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. रस्ता मंजूर असूनही विद्यार्थ्यांना नदी-नाले पार करुन शाळा गाठावी लागत आहे.
प्रगत महाराष्ट्राच्या राजधानीपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या विरारच्या तिल्हेरा गाव म्हणजे, 18 पाड्यांची मिळून एक ग्रामपंचायत. या गावात शाळा नसल्यानं इथल्या विद्यार्थ्यांना 3 किलोमीटरची पायपीट करावी लागते. या पायपिटीदरम्यान ओढे आणि एक नदी पार करुन विद्यार्थ्य़ांना शाळा गाठावी लागते.
विद्यार्थ्यांच्या या जीवघेण्याप्रवासामुळे आई-बापांच्या मनात कायम भितीचं घर करुन असते. कारण, शाळेसाठी मुलगा घराबाहेर पडला की, तो घरी पोहोचेल की नाही, याच चिंतेनं आई-बापच्या मनाची घालमेल होत असते.
शासनाकडून इथं रस्ता मंजूर झाला, पण तिथल्याच काही लोकांच्या विरोधामुळं पोरांना आपला जीव रोज धोक्यात घालावा लागतो आहे.
एकीकडे सरकारकडून सर्वशिक्षा अभियानाचे ढोल बडवले जातात. महाराष्ट्र शिक्षणात प्रगत असल्याचं सांगितलं जातं. पण याच प्रगत राज्याच्या राजधानी जवळ शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. या विद्यार्थ्यांकडे शिक्षणमंत्री लक्ष देणार का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
मुंबईजवळच्या विरारमध्ये विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Oct 2017 11:04 PM (IST)
मुंबई जवळच्या विरारमधील तिल्हेरा गावात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. रस्ता मंजूर असूनही विद्यार्थ्यांना नदी-नाले पार करुन शाळा गाठावी लागत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -