Chhath Puja Live updates : उत्तर भारतीयांचा छटपूजा हा पवित्र धार्मिक उत्सव आहे.हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईच्या विविध समुद्र किनारी आणि तलावांवर मुंबईत मोठी गर्दी उत्तर भारतीय बांधव करीत असतात. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने मुंबईच्या समुद्र किनारी आणि तलावांवर छटपूजेस बंदी घातली आहे. मात्र उत्तर भारतीय बांधवांना छट पूजा साजरी करता यावी म्हणून शिवसेना मात्र धावून आली आहे.शिवसेनेने मुंबईत छटपूजेसाठी कृत्रिम तलाव तयार करण्यास सुरुवात केली आहे.
कुर्ला, साकीनाका, चांदीवली, पवई या परिसरात शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या वतीने चार कृत्रिम तलाव छटपूजेसाठी तयार करण्यात येत आहेत. या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे.तसेच औषध फवारणी, मास्क सक्ती ने घालूनच प्रवेश असे नियमही करण्यात आले आहेत.
छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्य पूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो.हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड राज्यात हे व्रत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते.
छट पूजेमागील पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की, जरासंध राजाच्या पूर्वजांना कुष्ठ रोग झाला होता. तत्कालीन राजाची महारोगातून सुटका व्हावी, म्हणून धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुख्यत्वे सूर्यदेवाची पूजा केली होती. त्या पूजेचे फळ राजाला मिळाले आणि तो रोगमुक्त झाला. तेव्हापासून आजतागायत ही पूजा श्रद्धेने केली जाते. यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. सूर्याची किरणे प्रखर असतात. त्यात अनेक जीवजंतूचा नायनाट करण्याची क्षमता असते. तसेच सकाळची कोवळी किरणे शरीराला पोषक असतात. म्हणून डॉक्टरदेखील डी व्हिटॅमिन मिळवण्यासाठी रोज सकाळी अर्धा तास सूर्यप्रकाशात चालण्याचा किंवा व्यायाम करण्याचा सल्ला देतात. सूर्यप्रकाशाचे महत्त्व जाणून आपल्या संस्कृतीने सूर्योपासनेचे आणि सूर्यनमस्काराचे संस्कार घातले आहेत. यादृष्टीनेही छट पूजेचे महत्त्व सांगितले जाते.