मुंबई : मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर छठ पूजेला बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. छठ पूजेसाठी समुद्रावर होणारी गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार नाही, अशी शंका मुंबई महापालिकेला आहे. मुंबई महापालिकेच्या या निर्णयानंतर सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी भाजपने केली आहे. यासंदर्भात मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहेत.
दुसरीकडे बीएमसीच्या या निर्णयानंतर आता राजकारणही सुरु झालं आहे. किनाऱ्यावर छठ पूजेला बंदी म्हणजे हिंदूविरोधी कृत्य असल्याची टीका भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. तर मुंबईतील उत्तर भारतीयांचे नेते अशी ओळख असलेल्या काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी यंदा घरीच छठ पूजा साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.
सरकार आणि मुंबई महापालिका हिंदूविरोधी काम करत असल्याची शंका : अतुल भातखळकर
"बरेच दिवस आधी मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे छठ पूजा करण्याबाबत परवानगी मागितली होती. परंतु ऐन दिवाळीत वक्फ बोर्डाचे भाडे कोट्यवधीने वाढवले. मंदिरे सर्वात उशिरा उघडली आणि आता छठ पूजेलाही परवानगी नाकारली आहे. सरकार आणि मुंबई महापालिका हिंदूविरोधी काम करत आहे, अशी शंका माझ्या मनात येत आहे. अशा सरकार आणि महापालिकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो," अशा शब्दात भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
छठ पूजा अवश्य साजरी करा, पण सार्वजनिक ठिकाणी नाही : संजय निरुपम
"छठ पूजा अवश्य साजरी करा, पण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करुन साजरी करु नका. तुमच्या परिसरात एखादी विहीर, तलाव असेल तर किंवा इमारतीत, घरात छठची व्यवस्था करुन पूजा करा. जुहू बीचवर दरवर्षी लाखोच्या संख्यने लोक जमा होतात. यंदाही गर्दी झाली तर कोरोनाचा प्रादुर्भाव किती वाढू शकेल यांचा अंदाज लावता येणार नाही. याचा परिणाम सर्वसामान्य मुंबईकरांवर होऊ शकतो, जे चुकीचं आहे. त्यामुळे सामाजिक भान राखत यंदा जुहू बीच किंवा सार्वजनिक ठिकाणी जाऊन छठ पूजा साजरी करु नये. पण पूजा अवश्य करायला हवी," असं संजय निरुपम म्हणाले.
कोरोनामुळे यंदाच्या छठ पूजेवर निर्बंध
छठ पूजा यंदा 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांत प्रामुख्याने साजरा होणारा हा उत्सव गेल्या काही वर्षांपासून मुंबईतही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. जुहू बीचवर दरवर्षी छठ पूजेसाठी हजारो उत्तर भारतीयांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. छट पूजेच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी भाविक समुद्रकिनारी, तलाव, नदी किनारी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने जमतात. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने काही अटी घातल्या आहे. त्यात समुद्र किनारी, नदी किनारी किंवा तलावाच्या काठी हा उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Chhath Puja 2020 | मुंबईतील किनाऱ्यांवर छठपूजेला बंदी घातल्यानंतर राजकारणाला सुरुवात