दिपक भानुशाली असं प्रदूषणाची पोलखोल करणाऱ्या या माजी कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांनी डोंबिवलीच्या खंबाळपाडा एमआयडीसीतील एका बड्या रासायनिक कंपनीत तब्बल 25 वर्ष मोठ्या हुद्द्यावर काम केलंय. या भागातल्या रासायनिक कंपन्यांमध्ये दररोज लाखो लिटर रासायनिक सांडपाणी तयार होतं. या सांडपाण्याची विल्हेवाट लावल्याशिवाय नवीन उत्पादन करणं कंपन्यांना शक्य नसतं. तसंच सांडपाण्यावर प्रक्रिया करणंही कंपन्यांना परवडणारं नसतं. त्यामुळे या कंपन्या मध्यरात्री छुप्या पाईपमधून सांडपाणी थेट नाल्यात सोडतात, असा दावा भानुशाली यांनी केला आहे.
रासायनिक कंपन्या सांडपाणी प्रक्रिया न करताच नाल्यात सोडतात!
अशाप्रकारे दोन तीन कंपन्यांचं सांडपाणी जेव्हा प्रक्रिया न करताच नाल्यात एकत्र येतं, त्यावेळी त्यातून रिअॅक्शन होऊन गॅस निर्माण होतो आणि शहरात त्याचा परिणाम जाणवतो, असं भानुशाली यांनी सांगितलं. शिवाय हे पाणी सोडताना कॅमेरे, सेन्सर यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाते आणि कुणी आसपास आलं की लगेच ते बंद केलं जातं, असं सांगत या प्रक्रियेवर मी स्वतः काम केलं असल्याची माहितीही दिपक भानुशाली यांनी दिली. महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळं करत असताना कंपन्यांची कामा संघटना, एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना विश्वासात घेऊन संगनमतानं हे प्रदूषण केलं जात असल्याचा आरोपही भानुशाली यांनी केलाय. या सगळ्याबाबत एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्रतिक्रिया देण्याचे अधिकार आम्हाला नसल्याचं सांगत काहीही बोलणं टाळलं आहे. तर कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. अशाप्रकारे जर काही सुरू असेल, तर त्या कंपनीवर आम्ही सर्वात आधी कारवाई करू, अशी प्रतिक्रिया देवेन सोनी यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
डोंबिवलीत कंपन्यांकडून छुप्या पाईपद्वारे रासायनिक सांडपाणी नाल्यात, अधिकाऱ्यांचं प्रदूषणकारी कंपन्यांना पाठबळ?
दिल्लीतील प्रदूषणामुळे लोक तसंही मरतायत, मला फाशी देऊ नका; निर्भया प्रकरणातील दोषीची अजब विनंती
Pollution | डोंबिवली, ठाकुर्लीमधील प्रदुषणाचा एबीपीने लावला छडा | ABP Majha