नागपूर : विरोधी पक्षात बसलेल्या भाजपकडून अधिक प्रगल्भतेने जनतेचे प्रश्न मांडावेत, विकासावर बोलावं अशी अपेक्षा होती. पण सत्ता गेल्यामुळे सैरभैर झालेल्या भाजपने आपला वेळ राजकीय भाषणबाजीतच घातला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली. रोहित पवार यांनी आज विधानसभेत आपलं पहिलं भाषण केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला.


यावेळी त्यांनी बेरोजगारी, शिक्षण, उद्योग, शेती, महिला, तरुणांचे प्रश्न, सरकारी नोकरीतील रिक्त पदे आदी प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, वास्तविक विरोधी पक्षात बसलेल्या भाजपकडून अधिक प्रगल्भतेने जनतेचे प्रश्न मांडावेत, विकासावर बोलावं अशी अपेक्षा होती. पण सत्ता गेल्यामुळे सैरभैर झालेल्या भाजपने आपला वेळ राजकीय भाषणबाजीतच घातला. परिणारी सत्ताधारी महाआघाडीच्या मंत्र्यांनाही त्यांच्या राजकीय प्रश्नांना उत्तरं देण्यात वेळ खर्ची घालावा लागला. सत्तेतील आमचा भागीदार मित्र शिवसेनेला 'पुन्हा' ओढण्याचा भाजपचा डाव असल्याचं अजूनही त्यांच्या बोलण्यातून जाणवतं पण त्याचा आता काही उपयोग होणार नाही. विकासाच्या गोष्टी करताना राजकीय पतंगबाजी टाळली पाहिजे असं मला वाटतं, असे पवार म्हणाले.

ते म्हणाले की, बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर कौशल्य विकास योजना प्रभावीपणे राबवण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांत 3-4 हजार कोटी खर्च करुन सुरु केलेले 2200 स्किल डेव्हलपमेंट सेंटर आज बंद पडले आहेत. राज्याचा विकासदर घसरत आहे. पाच वर्षांपूर्वी आघाडी सरकारच्या काळात देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेलं राज्य गेल्या पाच वर्षात 13 व्या क्रमांकावर गेलं ही आपल्यासाठी निश्चितच भूषणावह गोष्ट नाही, असेही ते म्हणाले.

रोहित पवार पुढे म्हणाले की, पदव्या घेऊनही बेकारी वाढतच आहे. आहे त्या पोलिसांवर कामाचा प्रचंड भार पडत असताना आणि तरुणांच्या हाताला काम नसताना गेल्या पाच वर्षांत एकही पोलीस भरती झाली नाही. दरवर्षी 10% कारखाने बंद पडत आहेत. शिक्षणाच्या बाबतीतही राज्याची मोठ्या प्रमाणात घसरण होतेय. नीती आयोगाच्या अहवालानुसार 2015-16 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेलं आपलं राज्य 2018-19 मध्ये 6 व्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे. 1 लाख 22 हजार मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत, तर शिक्षणावरील निधीही दिवसेंदिवस कमी-कमी होत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याची ही अवस्था भीषण आहे. महाआघाडी सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत आणि या प्रश्नांवर येत्या काळात नक्की मार्ग निघेल असा मला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.

या भाषणानंतर लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार यांनी आजचा दिवस हा माझ्यासाठी आणि कर्जत-जामखेड या माझ्या मतदारसंघासाठी एकूणच वेगळा दिवस होता. राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या निमित्ताने विधानसभेत मला बोलण्याची जी संधी मिळाली तिचा उपयोग करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. राज्यातील जनतेचे प्रश्न मांडण्याचं आणि सोडवण्याचं एकमेव सभागृह म्हणजे विधानसभा आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षाकडून घातल्या जाणाऱ्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज झालं नाही. पण तिसऱ्या दिवशी कामकाज सुरळीत सुरु झाल्याने मला बोलण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील माझ्यासारखे अनेक तरुण आमदार पहिल्यांदाच या सभागृहात आले आहेत, असेही त्यांनी म्हटलं आहे.