नवी दिल्ली : हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर, दिल्लीतील निर्भया गँगरेपच्या दोषींना फासावर कधी लटकावणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु आता निर्भयाच्या सर्व दोषींना फासावर लटकवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील चारही दोषींना 16 डिसेंबर रोजीच फासावर लटकवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृह सचिव कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. अशातच निर्भया प्रकरणातील दोषी अक्षयने फाशीच्या शिक्षेवर फेरविचार करण्याबाबत याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून फाशी न देण्याबाबत अजब मागणी न्यायालयाकडे केली आहे.


'दिल्लीत वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे, येथील पाणीही विषारी झालं आहे, यामुळे आयुष्य आधीच कमी होत आहे. अशातच फाशी देऊन माझं आयुष्य का कमी करताय?'; असा प्रश्न निर्भया प्रकरणातील दोषी अक्षयने उपस्थित केला आहे. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने यासाठी त्याने वेद, पुराण, उपनिषद यांसारख्या ग्रंथांचाही हवाला दिली आहे. धार्मिक ग्रंथांनुसार, सतयुग आणि त्रेतायुगात लोक हजारो वर्ष जगू शकत होती. पण कलियुगात माणूस जेमतेम 50 वर्षचं जगतो. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची गरज काय? असा अजब दावा त्यानं केला आहे. दरम्यान, याप्रकरणातील इतर तीन जणांच्या याचिका न्यायालयाने आधीच फेटाळून लावल्या आहेत.


वकील ए.पी सिंह यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमध्ये महात्मा गांधींचाही हवाला देण्यात आला आहे. म्हटंल गेलं आहे की, 'महात्मा गांधी असं म्हणत असतं की, जर एखादा निर्णय घेताना कोणतीही शंका असेल तर समाजातील सर्वात गरिब व्यक्तीचा चेहरा आठवून विचार करा की, या निर्णयामुळे त्याला कोणता फायदा होणार आहे का?, तुमची शंका दूर होईल. मला फाशी दिल्याने कोणालाही काहीच फायदा होणार नाही.'


इतर तीन दोषींची याचिका न्यायलयाने फेटाळली


9 जुलै 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्भया प्रकरणातील इतर तीन दोषी मुकेश, विनय आणि पवन यांची याचिका फेटाळली होती. त्यावेळी न्यायालयाने सांगितले होते की, दोषींनी समोर ठेवलेल्या बाबींमधून निर्णय बदलण्याची गरज वाटली नाही. त्यावेळी अक्षयने याचिका दाखल केली नव्हती. दरम्यान, 5 मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता अक्षयने फाशीच्या शिक्षेवर फेरविचार करण्याबाबत याचिका दाखल केली आहे.


पाहा व्हिडीओ : सर्व चार दोषींना तिहार जेलमध्ये हलवलं, लवकरच फासावर लटकवण्याची शक्यता



काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?




  • सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.

  • सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते.

  • त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला.

  • यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.

  • तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं.

  • दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

  • मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.


निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा




  • पोलिसांनी या प्रकरणात 80 जणांना साक्षीदार बनवलं होतं.

  • निर्भया गँगरेप प्रकरणात एकूण सहा आरोपी होते. यामध्ये एका जण अल्पवयीन होता.

  • सहापैकी एक आरोपी राम सिंहने 11 मार्च 2013 रोजी तिहार जेलमध्ये आत्महत्या केली.

  • ज्युवेनाईल कोर्टाने अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवलं आणि तीन वर्ष बालसुधारगृहात ठेवल्यानंतर 20 डिसेंबर 2015 रोजी सुटका केली.

  • 10 सप्टेंबर 2013 रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाने चार आरोपींना दोषी ठरवलं आणि 13 सप्टेंबरला फाशीची शिक्षा सुनावली.

  • दोषींनी फास्ट ट्रॅक कोर्टाच्या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं. मात्र हायकोर्टानेही 13 मार्च 2014 रोजी चौघांची फाशी कायम ठेवली.

  • यानंतर दोषींनी फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2017 रोजी मुकेश, पवन, विनय आणि अक्षय चौघांची फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं.

  • यापैकी एक दोषी मुकेश कुमारने 9 नोव्हेंबर 2017 रोजी फेरविचार याचिका दाखल केली होती.

  • आता हे चौघेही तिहार कारागृहात आहेत.


संबंधित बातम्या : 

Nirbhaya Case | सर्व चार दोषींना तिहार जेलमध्ये हलवलं, लवकरच फासावर लटकवण्याची शक्यता

काय आहे उन्नावचं बलात्कार प्रकरण, नेमकं काय घडलं?

Hyderabad Rape Case : पोलिसांकडून चारही आरोपींचा एन्काऊंटर