ठाणे : ठाण्यातील आठवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक पटकावले आहे. गायत्री बेडेकर आणि अमृता बापट असे या दोघींचे नाव आहे. या मुलींनी घरबसल्या सायकलिंग करता-करता मोबाईल किंवा बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू चार्ज करता येतील असे मॉडेल बनवले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे मॉडेल बनवण्यासाठी अगदी साध्या वस्तूंचा उपयोग त्यांनी केला आहे.


सध्या सर्वजण आपल्या तब्येतीसाठी जागृत झाले आहेत. लॉकडाऊन सुरु असल्याने जिम बंद होत्या, त्यामुळे व्यायामाचा सर्वात सोपा उपाय म्हणून सायकल चालवण्यावर अनेकांनी भर दिला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सायकल खरेदी करुन फिट राहण्याकडे जास्त लक्ष देण्यात येत आहेत. हाच धागा पकडून अमृता आणि गायत्री या दोघींनी सायकलिंग करुन फिट राहण्यासोबतच मोबाईल चार्ज करुन वीज वाचण्याकडे देखील लक्ष वेधले आहे. सध्या जिममध्ये मोठ्या प्रमाणात सायकलिंगचे व्यायाम केले जातात. अशावेळी तिथेदेखील या मॉडेलचा उपयोग करुन मोठ्या प्रमाणात वीज वाचवता येऊ शकते. किंवा आपल्याकडे असलेल्या सायकलला स्टँड लावून घरी देखील या प्रयोग करता येईल. तसेच एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी तिथे वीज उपलब्ध नसते अशा ठिकाणी या मॉडेलचा सर्वात जास्त उपयोग होऊ शकतो, आणि हाच आमचा महत्त्वाचा उद्देश असल्याचे या दोघींनी सांगितले.



त्यांच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील यश मिळाले आहे. मागील महिन्यात इंडोनेशिया येथे झालेल्या 'इंटरनॅशनल सायन्स इन्वेन्शन फेअर' या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत या दोघींना रौप्य पदक मिळाले आहे. जगभरातून चाळीस देशांमधून साडेतीनशेपेक्षा जास्त प्रोजेक्ट या स्पर्धेत सहभागी झाले होते. सध्या इंडोनेशियाला जाणे शक्य नसल्याने तिथल्या परीक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने या दोघींच्या प्रोजेक्टचे परीक्षण केले. त्यात या दोघींनी यश संपादित केले आहे. भारतातून केवळ याच दोघींच्या मॉडेलला पदक प्राप्त झाले आहे. येणाऱ्या काळात हेच मॉडेल आणखी उपयोगात कसे आणता येईल याकडे लक्ष देऊन घरगुती वापरासाठी ते सुकर करण्याकडे लक्ष देणार असल्याचे गायत्री आणि अमृताने सांगितले आहे.