मुंबई : मुंबई पोलीस अशा टोळीचा शोध घेत आहे ती एअरटेल इंडियाने टाकलेल्या ऑप्टिकल फायबर केबल कापते. यामुळे कंपनीच्या ग्राहकांना फोन कॉलमध्ये आणि इंटरनेटचा वापर करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.


एअरटेल इंडियाचे सहाय्यक नोडल अधिकार प्रथमेश मांजरेकर यांनी नुकतीच यासंदर्भात मुंबईतील समतानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मुंबईच्या उत्तर उपनगरांमधील 56 ठिकाणी अशाप्रकार ऑप्टिकल फायबर केबल कापून त्यांचं नुकसान करण्यात आलं आहे.


मांजरेकर यांनी पोलिसांना सांगितलं की, "मागील काही दिवसांपासून उत्तर मुंबईच्या काही भागांमधून एअरटेल इंडियाच्या ग्राहकांकडून तक्रारी येत होत्या. त्यामध्ये स्लो इंटरनेट, फोन कॉलमध्ये अडथळा अशाप्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यानंतर कंपनीने काही अधिकाऱ्यांना तक्रारी आलेल्या ठिकाणी पाठवलं. यावेळी एअरटेलच्या अधिकाऱ्यांना समजलं की, 56 ठिकाणी खड्डा खोदून ऑप्टिकल फायबर केबल कापल्याचं समोर आलं."


"याआधी अशाच एका ठिकाणी जेव्हा आमचा प्रतिधिनी दुरुस्तीचं काम करण्यासाठी गेला असता काही अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला केला होता," असंही प्रथमेश मांजरेकर यांनी पोलिसांना सांगितलं.


मांजरेकर यांच्या माहितीनुसार, "त्यांचा रिपेअरिंग स्टाफ जेव्हा कधी अशा ठिकाणी केबल दुरुस्तीचं काम करत असतात त्यावेळी आणखी एका ठिकाणावरुनही अशाच प्रकारच्या तक्रारी येत होत्या."


ठकोरोना संकटाच्या काळात आजही अनेक कर्मचारी आपल्या घरातूनच काम करत आहेत. त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तर ती आहे इंटरनेट. पण जर ऑप्टिकल फायबर केबलच कापली जात असेल तर लोकांना इंटरनेट वापरण्यात अडचणी येतात आणि आम्हाला तशा तक्रारी मिळाल्या आहेत," असंही त्यांनी सांगितलं.


बऱ्याचदा अशाप्रकारे केबल कापण्यामागचा हेतू एकच असतो तो म्हणजे चोरी. पण नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये एअरटेल इंडियाच्या ज्या ऑप्टिकल फायबर केबल कापण्यात आल्या त्या कोणीही चोरलेल्या नाहीत. या घटना पाहिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे की असं करुन कोणालातरी जाणीवपूर्वक कंपनीचं आर्थिक नुकसान करायचं आहे. यानंतर कंपनीने समतानगर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे.


पोलिसांनी एअरटेल इंडियाकडून मिळालेल्या तक्रारीवर कारवाई करत अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसीच्या कलम 427 आणि इंडियन टेलीग्राफ एक्सच्या कलम 25 आणि 25 A अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.