मुंबई : दैनिक सामनामध्ये भाजपाबद्दल वापरण्यात येणारी भाषा याबद्दल आज सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्र लिहिले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, रश्मी ठाकरे यांना व्यक्ती म्हणून मी चांगला ओळखतो व मला खात्री आहे की, त्यांनाही ही भाषा आवडत नसेल. संपादक या नात्याने त्या या गोष्टींचा नक्की विचार करतील, अशी मी आशा बाळगतो.


चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सामना ऑनलाईन, ऑफिस ऑफ उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टॅग करून त्यांचेही लक्ष या पत्राकडे आकर्षित केले आहे.


काय आहे पत्रात?
आज आपणास पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय नेते तसेच भाजप महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल वापरण्यात येणारी खालच्या स्तराची भाषा! वहिनी आपणाला या पत्राद्वारे मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात, वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या, त्यातील भाषा यासर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. वहिनी मी आपणाला एक व्यक्ती म्हणून चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की, आपणालाही ही भाषा आवडत नसेल.



आपणाला या पत्राद्वारे मी एवढीच विनंती करू इच्छितो की, संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा. जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!


काय आहे प्रकरण?
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला होता. राजकीय भडास काढण्यासाठी भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहे, असं राऊत म्हणाले होते. शिवाय सामनातूनही भाजप नेत्यांवर टीकेचे बाण सोडण्यात आले होते. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "सामनातून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली त्याबाबत मी रश्मी वहिनींना पत्र लिहिणार आहे. तुम्ही 'सामना'च्या संपादिका आहात, म्हणजे हा अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. ही तुमची भाषा असू शकत नाही. मग अग्रलेखात ही भाषा कशी? असा प्रश्न त्यांना विचारणार आहे."


संबंधित बातमी : 


'चंद्रकांत पाटील पत्र लिहिताहेत, बाप रे... मला भीती वाटतेय', संजय राऊतांची खोचक टीका