मुंबई : सामनातील लिखाणाच्या भाषेबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप नोंदवत संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं होतं. यावरुन सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली आहे. 'अरे बापरे… ताबडतोब… लगेच. मला आता त्यांची भीती वाटतेय… ते पत्र लिहतायेत अशी खोचक टीका राऊतांनी केलीय. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील. सकारात्मक नजरेतून महाराष्ट्र आणि देशाकडे बघतील. सामना वाचत राहिले, तर त्यांचा विश्वास बसेल की, पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार राहणार आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.


औरंगाबाद नामांतरावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, औरंगाबादचं संभाजीनगर करण्यामध्ये कोणतेही राजकारण नाही. याचं नामकरण बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वी केलं आहे. सरकारी कागदपत्रावर नाव बदलायचं आहे. मात्र यामुळं महाविकास आघाडीत हा मतभेदचा विषय नाही, असं राऊत म्हणाले.


'चिंतातुर जंतूप्रमाणे भाजपनं उगाच वळवळ करू नये', औरंगाबादच्या मुद्यावरुन शिवसेनेचं टीकास्त्र

विरोध असेल तर सगळे बसून हा प्रश्न सोडविला जाईल. भाजप काहीही बोलते फस्ट्रेशन बाहेर काढते. बाळासाहेब ठाकरेही हिंदू ह्रदय सम्राटच राहतील. बाळासाहेब थोरात बोलत आहेत पण हा प्रस्ताव नाही. हा प्रश्न भाजपच्या नेत्यांना विचारायला हवा. शिवसेना संभाजीनगरबाबत काय करणार? असा प्रश्न ते विचारत आहेत. भाजपने 5 वर्ष काय केलं? 5 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही अयोध्या, प्रयागराज नावं बदलली त्यावेळेसच नाव का बदललं नाही, असं राऊत म्हणाले.


शहराच्या नावावरून काही मतभेद असू शकत नाही. काँग्रेस नेते जे महाराष्ट्रत आहेत. अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात,पृथ्वीराज चव्हाण जे कोणी नेते असतील. त्यांचं प्रेम श्रद्धा ही औरंगजेबापेक्षा संभाजी महाराजांवर जास्त असणार आणि आहे. प्रत्येक हिंदूंची श्रद्धा यावर आहे, असं राऊत म्हणाले.