Central railway : मध्य रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. तिकीट तपासणी मोहिमेतून 7 महिन्यात जवळपास दोनशे कोटींची कमाई केली आहे.  एप्रिल-ऑक्टोबर या सात महिन्यात तिकीट तपासणीतून 193.62 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे 7 तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी प्रत्येकी 90 लाखांपेक्षा जास्त वसूली केली आहे. 


विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करते.  विनातिकीट प्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.


एप्रिल-ऑक्टोबर 2022 दरम्यान, विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण 29.03 लाख प्रकरणे आढळून आली, जी  मागील वर्षीच्या याच कालावधीत 16.16 लाख प्रकरणे होती, ज्यामध्ये 79.46% ची वाढ दिसून येत आहे.


अशा विनातिकीट/अनियमित प्रवासातून मिळालेला महसूल एप्रिल-ऑक्टोबर 2022 या कालावधीत 193.62 कोटी नोंदवला गेला, तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 93.29  कोटींची नोंद झाली होती, त्यात 107.54% ची वाढ झाली आहे. ऑक्‍टोबर २०२२ या महिन्‍यात, विनातिकीट/अनियमित प्रवासाच्या व बुक न केलेल्या सामानासह 4.44 लाख  प्रकरणांद्वारे मध्य रेल्वेने 30.35  कोटींचा महसूल नोंदवला आहे.


सात कर्मचाऱ्यांची दमदार कामगिरी


मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने विनातिकीट आळा घालण्यासाठी बरेच प्रयत्न केले. 2022-23 या आर्थिक वर्षात तिकीट तपासणी कर्मचार्‍यांपैकी चार जणांनी एक कोटी रुपयांहून अधिक महसूल गोळा करून उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे.  यात डी. कुमार, टीटीआय, मुख्यालय मुंबई यांनी 15053 प्रकरणांमधून 1.43 कोटी, एस. बी. गलांडे, टीटीआय, मुख्यालय मुंबई यांनी 14837 प्रकरणांमधून 1.34 कोटी,  एच. ए. वाघ, टीटीआय, मुख्यालय मुंबई यांनी 11634 प्रकरणांमधून 1.04 कोटी,  सुनील डी. नैनानी, टीटीआय, मुंबई विभाग यांनी  12137 प्रकरणांमधून 1.03 कोटी रुपयांची वसूली केली आहे. 
 
 याशिवाय, भुसावळ विभागातील 2 आणि पुणे विभागातील एक असे तीन तिकीट तपासणी कर्मचारी आहेत ज्यांनी या आर्थिक वर्षात 90 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.  प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केलं आहे.


 भाडे-व्यतिरीक्त महसूलाची 39.45कोटी आणि पार्सल महसूलाची 150.87 कोटी नोंद
 
आर्थिक वर्ष 2022-23मध्ये (एप्रिल ते ऑक्टोबर) मध्य रेल्वेची कामगिरी गतवर्षीच्या याच कालावधीतील12.16 कोटीच्या तुलनेत 39.45  कोटींच्या विक्रमी महसूलासह प्रभावी ठरली आहे.  मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल ते ऑक्टोबर) मध्ये 3.01 लाख टन पार्सल आणि सामानाच्या वाहतुकीद्वारे 150.87 कोटींचा महत्त्वपूर्ण महसूल देखील नोंदवला.