MLC Election 2022 : विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील आमदारांवर दबाव टाकण्यासाठी फोन करत असल्याचं पटोले यांनी म्हटलं. याबाबत सगळी माहिती आमच्याकडे आहे. वेळ आली की ही माहिती समोर आणू, असं नाना पटोले यांनी सांगितलं. भाजपने कितीही अडथळे निर्माण केले तरी विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.


याविषयी नाना पटोले म्हणाले की, योग्य वेळ आल्यावर जनतेसमोर या गोष्टी मांडू. आमच्या हाती आलेल्या रेकॉर्डनुसार ईडी आणि सीबीआय यांचा दुरुपयोग कसा सुरु आहे हे निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला समजत आहे. भाजप सीबीआय आणि ईडीचा हत्यार म्हणून वापर करत आहे. ही लोकशाहीसाठी घातक आहे.


यावर कोणती कायदेशीर कारवाई करणार का असा सवाल विचारलं असता नाना पटोले म्हणाले की, "सुप्रीम कोर्टाचे न्यायामूर्ती मीडियासमोर येऊन न्याय मागत आहे, यावरुन काय परिस्थिती आहे याचा अंदाज येऊ शकतो. आम्ही जनतेच्या दरबारातच ही गोष्ट घेऊन जाऊ. हे लोक सत्तेचा कसा गैरवापर करतात हे त्यांच्यासमोर मांडू."


पटोलेंचे आरोप बिनबुडाचे : प्रवीण दरेकर प्रतिक्रिया
दरम्यान नाना पटोले यांचे आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत. हातात काही पुरावे नसताना केवळ बोलायचं, बोलाचीच कढी, बोलाचीच भात अशी या नेत्यांची वक्तव्ये आहेत. त्यांच्या आरोपांना ना आम्ही गांभीर्याने घेत ना आमदार, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षेनेत प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, "अशाप्रकारचे आरोप करुन संशयाचं भूत उभं करायचं अशी नाना पटोले आणि संजय राऊत यांती कार्यपद्धती आहे. दबाव आणायला आमदार इमॅच्युअर्ड आहेत का? आमदार तीन लाख नागरिकांचं प्रतिनिधित्त्व करतात. ते प्रगल्भ असतात. आमदारांवर दबाव टाकून किंवा प्रलोभनं दाखवून दे बदलत असतात का? आमदारांना अंटरएस्टिमेट का करतात? आमदार बिकाऊ असतात, दबावाला बळी पडतात. अशाप्रकारचा संशय किंवा वक्तव्य करणं हा त्यांच्यावर अविश्वास दाखवलयासारखं आहे. कोणत्याही तपास यंत्रणा असं करत नाही, करण्याचं कारण नाही. जर रेकॉर्डिंग असेल तर पोलिसात जात. सरकार तुमचं आहे. प्रसारमाध्यमांसमोर वाद घालण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा.