मुंबई : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटसंदर्भात आता चौकशी होणार आहे. केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. मात्र आता अनिल देशमुख यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते, असं देशमुख यांनी म्हटलंय.
देशमुख म्हणाले की, लता मंगेशकर आमचे दैवत असून सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशातील जनता मानत असल्याने त्यांच्या चौकशीचा प्रश्नच उदभवत नाही. या ट्विट प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख आणि इतर 12 इन्फ्लुएन्सरचा समावेश असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलीस कार्यवाही करत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, कोणत्याही सेलिब्रेटींनी जे ट्विट केलं ते आमचं मत होतं अशी भूमिका घेतली नाही. याची चौकशी करण्याच्या आमच्या मागणीनंतर एकाही सेलिब्रेटी व्यक्ती पुढे आला नाही. त्यावरून आमची मागणी योग्य होती. भाजप आयटी सेल आणि इन्फ्लुएन्सर ह्यात सहभागी आहेत. यात चौकशी केल्यास अजून गोष्टी समोर येतील असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे.
पॉप गायिका रिहानासह इतरांना उत्तर देताना अनेक सेलिब्रिटींनी विरुद्ध ट्वीट केलं होतं. यामध्ये सुनील शेट्टीने मुंबई भाजप नेते हितेश जैन यांना टॅग केलं होतं. तर अक्षय कुमार आणि सायना नेहवाल ह्यांच्या ट्वीटमधील शब्द आणि शब्द समान होता. यावरून हे सेलिब्रिटी भाजप सरकारच्या दबावात येऊन ट्वीट करत आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता.