मुंबई : मुंबई पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी शाखा संपूर्ण अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईत पसरलेल्या ड्रग्सच्या जाळ्याचा अंत करण्यासाठी ऑपरेशन क्लीन पोलिसांनी सुरू केलं आहे. गेल्या 4 महिन्यांत अंमली पदार्थ विरोधी शाखेने 16 कोटी रुपयांचे ड्रग्सच पकडले आहे, तर 45 हून अधिक ड्रग्ज तस्कर आणि सप्लायरला सुद्धा पकडले आहे. यावरुन अंदाज बांधला जाऊ शकतो ही किती मोठ्या प्रमाणावर ही कारवाई सुरु करण्यात आली आहे.


अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अंमली पदार्थ विरोधी शाखेचा पदभार सांभाळल्या दिवसापासून मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी वाईट दिवस सुरू झाले आहेत. दररोज अंमली पदार्थाविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे, यामुळे ड्रग्सच्या धंद्यातील गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.



मायानगरी मुंबईला व्यसनाच्या आधीन करणाऱ्यांची आता खैर नाही. कारण अंमली पदार्थ विरोधी शाखेने आपला हंटर सतत सुरू ठेवला आहे. या हंटरचा परिणाम असा झाला की केवळ काही दिवसातच कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स पकडले गेले तर तर ड्रग्स पेडलरही पकडले जात आहेत. गेल्या चार महिन्यांपासून अंमली पदार्थ विरोधी शाखेच्या आकडेवारीनुसार एकूण 16 कोटींचे ड्रग्स जप्त केले गेले आहे. त्यातील एमडी ड्रग्जची मात्रा सर्वाधिक आहे. कारण त्याची मागणी सर्वाधिक आहे. या चार महिन्यांत अंमली पदार्थ विरोधी शाखेने गुन्हे दाखल करत 45 पेक्षा अधिक ड्रग्स विक्रेत्यांना अटक केली आहे.




  • 17 ते 31 ऑक्टोबर 2020 दरम्यान 37 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त केले.

  • नोव्हेंबर 2020 - 3 कोटी 91 लाख 55 लाख किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले.

  • 2020 डिसेंबर - 2 कोटी 28 लाख रुपयांची ड्रग्स जप्त.

  • जानेवारी 2021 - 4 कोटी 6 लाख 83 हजार रुपयांचे ड्रग्स जप्त.

  • 2021 फेब्रुवारी - 4 कोटी 44 लाख 20 हजार ड्रग्स जप्त केल गेलं.


अंमली पदार्थ विरोधी शाखेच्या म्हणण्यानुसार, ड्रग पेडलर्स नवीन पद्धतीने ड्रग्सची तस्करी करतात ज्याचा शोध घेणे अवघड आहे. परंतु आम्ही त्यांना पकडण्यासाठी कठोर परिश्रम करून त्यांचे मनसुबे हाणून पाडण्यास सक्षम असल्याचं दत्ता नलावडे यांनी सांगितलं.