मुंबई : एखाद्या लहान मुलाचं वजन जरा जास्त असलं तर किती गुटगुटीत बाळ आहे, असं बऱ्याचदा म्हटलं जातं. पण मुलांच्या वाढत्या वजनाकडे वेळीच लक्ष देणं सध्या गरजेचं बनलं आहे. कारण मुलांमधली ही स्थूलता अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरते. मुलांची प्रकृती उत्तम राहण्यासाठी मुलांचा बॅाडी मास इंडेक्स हा वयानुरुपच असायला हवा. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा मोठा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. बैठे खेळ आणि मुलांची शारिरीक हालचाल कमी झाल्याने वजन वाढण्याची समस्या वाढू लागली आहे. कम्प्युटर, टीव्ही, इंटरनेटचा अतिवापर, टीव्हीसमोर बसूनच जेवण करणं, या सर्व सवयींचा दुष्परिणाम म्हणजे लठ्ठपणा.


सध्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी वाढलेला अभ्यासक्रम किंवा अभ्यासाचा ताण, तसंच पालकांच्या वाढत्या अवास्तव अपेक्षा या सर्वच घटकांचा मुलांच्या मेटाबॉलिझमवर दुष्परिणाम होऊन वाढ होऊन वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढते, आपल्या मुलांचं वजन कसं नियंत्रणात ठेवायचं, मुलांसाठी सर्वोत्तम आहार कोणता, तुमच्या मुलांचं वजन प्रमाणापेक्षा अधिक आहे हे कसं ओळखायचं. जर तुमच्या मुलामध्ये ओबेसिटीची समस्या असेल तर त्यावर उपाय काय करावेत, याविषयी डॉ. संजय बोरुडे यांनी 'ब्रेकफास्ट न्यूज'मध्ये मार्गदर्शन केलं आहे.



फॅट सेल्स आणि स्थूलपणा
डॉ. बोरुडे यांनी सांगितलं की, "गुटगुटीत बाळ म्हणजे हेल्दी बाळ हा समज चुकीचा आहे. मूल जन्मल्यापासून लठ्ठपणा येऊ शकतो. शरीरातील चरबीचं वाढलेलं प्रमाण हे स्थूलतेचं कारण असतं. वैद्यकीय भाषेत आम्ही लठ्ठपणाला अनेक आजारांची जननी म्हणतो. लठ्ठपणामुळे मधुमेह, अनियमित रक्तदाब असे अनेक आजार होतात. प्रौढांमध्ये वयाच्या तिशी-चाळीशीनंतर फॅट सेल्स वाढल्याने लठ्ठपणा येतो. परंतु लहान मुलांमध्ये नंबर ऑफ फॅट सेल्स वाढल्याने स्थूलपणा वाढतो. उदाहरणार्थ लहान असताना आपल्या शरीरात 100 फॅट सेल्स असतात. पण ओबेसिटी असलेल्या बाळांमध्ये 200 फॅट सेल्स असतात. म्हणजेच त्यांच्या 200 फॅट सेल्स वाढतात."

लठ्ठपणाची कारणं कोणती?
लठ्ठपणाची कारणं विचारली असता डॉ. संजय बोरुडे म्हणाले की, "बालपणातील लठ्ठपणाची कारणं वेगळी असतात. जन्मल्यापासून मुलांमध्ये स्थूलपणा येऊ शकतो. अनुवांशिकता हे पण लठ्ठपणाचं कारण आहे. आई आणि वडील लठ्ठ असले तर बाळही लठ्ठ होण्याचं शक्यता वाढते. तर मुलं 24 तासातील 8 ते 9 तास शाळेत घालवतात. शाळेतील वातावरण किती पोषक आहे आणि किती नाही यावरही लठ्ठपणा अवलंबून असतो. तसंच जंक फूड, मुलांना खेळायला जागा नाही, अभ्यासातील नंबर गेम्समुळे मुलांवरील ताण यामुळेही लठ्ठपणा येऊ शकतो."

ओबेसिटीसाठी सपोर्ट टीम
"लठ्ठपणासाठी आम्ही चाईल्डहूड ओबेसिटी सपोर्ट टीम तयार केली असून तिची सेवा पूर्णत: मोफत आहे. इथे फोन केल्यावर टीमचे सदस्य समस्येविषयी सल्ला देतात किंवा शक्य असेल तर आम्ही रुग्णांना केंद्रांवर भेट देण्यास सांगतो. तसंच मंत्री गिरीश महाजन यांनी या कल्पनेला शासकीय मान्यता दिली आहे. यासोबतच वेबसाईटच्या माध्यमातून पालकांना शिक्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे," अशी माहिती डॉ. बोरुडे यांनी दिली.

कोणतं डाएट चांगलं?
डाएटविषयी डॉ. बोरुडे म्हणाले की, "शाकाहारी, वेगन डाएट चांगलं आणि मांसाहार खराब हा मोठा भ्रम आहे. उलट आपलं मानवी शरीर हे विशेषत: अॅनिमल बॉडी आहे. अॅनिमल बॉडीमध्ये अॅनिमल प्रोटिन सहजरित्या पचतात. तर प्लान्ट प्रोटिन पचायला जड असतात. मात्र सप्लिमेंट प्रोटिन अतिशय खराब असतात. ते न खाण्याचाच सल्ला आम्ही रुग्णांना देतो. लठ्ठपणा होऊ नये, यासाठी माझा सल्ला असा आहे की, सोमवार ते शनिवार तोंडाला कुलूप लावा. या दिवसात तुम्ही पोळी, भाजी, भात, वरण असा चौरस आहार घ्यावा आणि रविवारचा एक दिवस चीट डे ठेवा. त्या दिवशी आवडेल ते खा. यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. पण चीट डेच्या एक दिवस आधी आणि नंतर दुप्पट व्यायाम करा. भरपूर कॅलरी बर्न करा."