मुंबई : दिवाळीनंतरच्या आलेल्या रविवारी हजारो मुंबईकरांनी राणीच्या बागेत जाणं पसंत केलं आहे. त्यामुळे राणीच्या बागेचा अनोखा विक्रम झाला. राणीच्या बागेत गेल्या रविवारी तब्बल 19 हजार लोकांनी भेट दिली. यामुळे प्रवेश शुल्कातून राणीच्या बागेला तब्बल 7 लाख 10 हजारांचं उत्पन्न मिळालं आहे. हा राणीच्या बागेतला आतापर्यंतचा विक्रम मानला जात आहे.


गेल्यावर्षी दिवाळीनंतर आलेल्या रविवारी 16 हजार लोकांनी राणीच्या बागेला भेट दिली होती. त्यावेळी राणीच्या बागेला 6 लाख 60 हजारांचं उत्पन्न मिळालं होतं. मात्र यावर्षी मागील वर्षाचाही विक्रम मोडला. यंदा राणीच्या बागेत असलेले पेंग्विन पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे बच्चे कंपनीसह अनेकजण याठिकाणी हजेरी लावत आहेत.


रविवारी गर्दीमुळे राणीच्या बागेतील प्रवेश संध्याकाळी 5 वाजता बंद करण्यात आला होता. त्यावेळी जे लोक रांगेत उभे होते, त्यांनाच राणीच्या बागेत प्रवेश मिळाला. त्यामुळे जवळपास दोन हजार लोकांना पुन्हा परतावं लागल्याची माहिती राणीच्या बागेतील अधिकाऱ्यांनी दिली. दिवाळीत राणीच्या बागेला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते, मात्र यावर्षी अपेक्षेपेक्षा जास्त नागरिकांनी राणीच्या बागेला भेट दिल्याचं राणीच्या बागेतील अधिकाऱ्यांनी म्हटलं.


रविवारी एकूण 18,721 तिकीटांची विक्री झाली. पेंग्विन दाखल झाल्यापासून राणीच्या बागेचं प्रवेश शुल्क वाढवण्यात आलं आहे. सध्या लहान मुलांसाठी 25 रुपये आणि मोठ्यांसाठी 50 रुपये असे तिकीटाचे दर आहेत. तर 100 रुपयांचं फॅमिली तिकीटही याठिकाणी उपलब्ध आहे.