मुंबई : "शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनाही अटक करा, नाहीतर मुंबईत मोर्चा काढू," असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. यासाठी आंबेडकरांनी सरकारला 26 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे.


"कोरेगाव-भीमा हिंसाचार भडकावण्याच्या कटात मिलिंद एकबोटे यांच्यासह संभाजी भिडेही यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे मिलिंद एकबोटेंना अटक केल्यानंतर आता संभाजी भिडेंनाही 26 तारखेपर्यंत अटक करा, अन्यथा कोरेगाव-भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे मुंबईत मोर्चा काढू," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

"तसंच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बंद केलेल्या शिष्यवृत्ती सुरु करा," अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे केली आहे.

दरम्यान, हिंदू एकता आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार भडकवल्याचा आरोप एकबोटे यांच्यावर आहे. सुप्रीम कोर्टाने काल मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहत्या घरातून एकबोटेंवर अटकेची कारवाई केली.

काय आहे प्रकरण?
1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा इथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर सणसवाडीत दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.

ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस आपण तिथं नव्हतो, तसेच आपल्या झालेल्या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचा दावा एकबोटे यांनी केला आहे. एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील सत्र न्यायालयाने 22 जानेवारीला फेटाळला. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टानेही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर मिलिंद एकबोटेंनी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

संबंधित बातम्या :


मिलिंद एकबोटेंना 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

अखेर मिलिंद एकबोटे यांना अटक, घरी जाऊन पोलिसांची कारवाई!

एकबोटेंना अटक का केली नाही?, विश्वास नांगरे पाटलांचं उत्तर...

महाराष्ट्र सरकारच्या एकबोटे बचाव धोरणाचे सुप्रीम कोर्टात धिंडवडे

मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

दगडफेकीप्रकरणी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेंवर गुन्हा

मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

मिलिंद एकबोटेंच्या शोधात पोलिसांचा हलगर्जीपणा