मुंबई : अभिनेता राहुल बोसने फाइव्ह स्टार हॉटेलमधील अव्वाच्या सव्वा किंमती त्याच्या सोशल मिडीयावरील पोस्टद्वारे समोर आणल्यानंतर आणखी एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या खाद्य पदार्थांच्या किमतीबाबतची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. कार्तिक धार या व्यक्तीने राहुल बोसच्या पोस्ट नंतर मुंबईच्या 'फोर सीजन हॉटेल'च्या बिलाचा फोटो पोस्ट करून 2 बॉईल अंड्यांची किंमत तब्बल 1700 रुपये असल्याचा समोर आणलं आहे. तर याच बिलात डबल ऑम्लेटची किंमत सुद्धा 1700 रुपये इतकी लावण्यात आली आहे

मात्र हे पदार्थ या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये इतके महाग का? यावर सरकारचे काही निर्बंध आहेत का? आपण याबाबत तक्रार करू शकतो का? याविषयी माहिती काढण्याचा आम्ही प्रयत्न केला. याबाबत ग्राहक तक्रार मंचचे मार्गदर्शक ऍड. आनंद पटवर्धन यांच्याशी बातचित केली आहे. 'आतापर्यंत असे कोणतेही नियम किंवा निर्बंध फाइव्ह स्टार हॉटेल्सवर लादलेले नाहीत. जेणेकरून आपण या किंमतीवर लगाम लावू शकतो. ग्राहक म्हणून जेव्हा एखादा ग्राहक फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जातो तेव्हा त्याला साहजिकच तेथील खाद्य पदार्थ, तेथील इतर सेवा महाग असणार याची कल्पना असते. तरी सुद्धा आपण एकदा मेन्यू कार्ड नीट तपासून जास्तीचे पैसे हॉटेल लावत तर नाही ना ? याची खात्री करून घ्यावी', असे त्यांनी म्हटले आहे.

अशा हॉटेल्सवर तक्रार केव्हा करता येते?

जेव्हा होटेलच्या मेन्यू कार्डमधील किमती किंवा देण्यात येणाऱ्या सर्व्हिसेसमधील किमती यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळते किंवा एखादं हॉटेल लावलेल्या बिलावर कर भरत नसेल तर ग्राहक या विरोधात ग्राहक मंचाकडे संबधित हॉटेलची तक्रार करू शकतो.

अशा प्रकारची तक्रार अभिनेता राहुल बोस याने त्याला 2 केळीची किंमत 442 रुपये लावल्यानंतर केली होती. त्यानंतर टॅक्स अँड एक्ससाइज डिपार्टमेंटने त्याची दखल घेत चंदीगडच्या 'जे डब्लू मॅरीअट हॉटेल'ला 25 हजार रुपयांचा दंड लावला. कारण त्या ठिकाणी लावलेल्या जास्तीच्या किंमतीवर टॅक्स लावला जात नव्हता हे समोर आलं होतं.

फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा, तेथील वातावरण (ambiance), केला जाणार पाहुणचार या सगळ्या गोष्टींवर हॉटेलमधील कुठल्याही किमती ठरवल्या जातात.