मुंबई : भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे, अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. पूर ओसरल्यानंतर पुनर्वसनाचे अवघड आव्हान प्रशासनासमोर आहे. यामध्ये भाजपाने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.


त्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना निधी संकलनाचे आवाहन चंद्रकांत पाटलांनी केले आहे. सोमवारी पक्षाचे सर्व खासदार, आमदार, महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन देण्याची सूचना केली. सर्व लोकप्रतिनिधींनी ‘भारतीय जनता पार्टी, आपदा कोष’ नावाने आपले चेक किंवा ड्राफ्ट द्यावेत, अशा सूचना त्यांनी केली.


भाजपच्या कार्यकर्त्यांनी किमान शंभर रुपये तर कमाल हवे तितके योगदान पक्षाकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा करावे, असंही ते म्हणाले. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी भाजपतर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी होणाऱ्या कार्यासाठी भाजप महाराष्ट्र पूरग्रस्त सहाय्यता संयोजक म्हणून माजी प्रदेश संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. लवकरच समितीची स्थापना करण्यात येईल.


पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात पंचगंगा आणि सांगलीत कृष्णा नदीने पाणीपातळी ओलांडली, परिणामी दोन्ही जिल्ह्यात पूर आला. परंतु या महाप्रलयात हजारोंचे संसार उद्ध्वस्त झाले. पूर परिस्थिती हळूहळू कमी होत आहे, मात्र पुराची भीषणता समोर येत आहे. याठिकाणी मोठ्या मदतीची सध्या गरज आहे.  या नागरिकांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वच स्तरातून मदत पुरवली जात आहे.



संबंधित बातम्या