मुंबई : सांगली, कोल्हापूर भागात पुराने थैमान घातल्यनंतर आता सोशल मीडियावर मेसेजेसचा पूर वाहू लागला आहे. अमुक ठिकाणी लोकं अडकली किंवा आमच्या काही लोकांशी संपर्क तुटला आहे, असे अनेक मेसेज सोशल ग्रुपवर व्हायरल होत आहेत. अशा कुठल्याही व्हायरल मेसेजवर विश्वास ठेऊ नये. किंवा अशा मेसेजची खात्री केल्याशिवाय मेसेज फॉरवर्ड करु नये, असं आवाहन महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन विभागाने केलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. त्यामध्ये तिवरे धरण, पुण्याची भिंत दुर्घटना, ठाण्यातील पूरपरिस्थिती आणि सांगली कोल्हापूरची पूरपरिस्थितीतून आतापर्यंत 4 लाख 67 हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. या संपूर्ण परिस्थितीमध्ये मंत्रालयात कार्यरत असणाऱ्या आपत्कालीन विभागाने मोलाची भूमिका बजावली.


या पूरपरिस्थितीत देशातले एकूण 8 विभाग कार्यरत होते. ज्यामध्ये मिलिटरी, नेव्ही, एअर फोर्स, कोस्ट गार्ड, पोलीस, एनडीआरफ, पॅरा मिलिटरीसह स्थानिक पथकांना महत्वाची भूमिका बजावली आहे. यापैकी कोल्हापूरमध्ये 56 विविध पथके तर सांगलीमध्ये 26 पथके काम करत आहेत. पूरपरिस्थिती नियंत्रणात येईल तशी केद्रातील पथके परत पाठवण्यात येणार आहेत.


सांगली आणि कोल्हापूरमध्ये आता अनेक वैद्यकीय पथके दाखल झाली आहेत. पावसाने विश्रांती घेतली आहे, तरी बऱ्याच प्रमाणात पाणी अजूनही काही गावांमध्ये आहे. ज्या घरातील पाणी ओसरलं आहे, त्या घरात नुसता चिखल जमा झाला आहे. घरातील सामानाचं मोठं नुकसान झालं आहे. अशावेळी कोणतीही अफवा परसवण्यापेक्षा लोकांना मदतीचा हात देणं गरजेच असल्याचं शासनानं आवाहन केलं आहे.