राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. त्याआधी ही निवडणूक होते आहे. त्यामुळे नारायण राणे यांचं भवितव्य यावर अवलंबून आहे. स्वतःचा पक्ष स्थापन झाल्यावर नारायण राणे यांची ही पहिली परीक्षा आहे.
आधी शिवसेना, मग काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणेंनी भाजपचे दारही ठोठावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथेही प्रतिसाद न मिळाल्याने स्वत:चा पक्ष स्थापन केला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थान केल्यावर ते एनडीएमध्येही सहभागी झाले. यानंतर राणेंची भाजप सरकारमध्ये वर्णी लागेल, अशीही चर्चा सुरु आहे. पण मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजूनही चित्र स्पष्ट होत नसताना नारायण राणे यांच्या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे.
या निवडणुकीसाठी 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नारायण राणे उभे राहणार का? ते उभे राहिले तर निवडणूक चुरशीची असेल, पण त्याचवेळी राणे यांना दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधानसभेतील पक्षीय बलाबल :
भाजप - 122
शिवसेना - 63
काँग्रेस - 42
राष्ट्रवादी काँग्रेस - 41
इतर - 20
भाजपची मतं राणेंच्या पारड्यात?
भाजपची 122 मते राणेंच्या पाठीशी निश्चित असल्याचं मानलं जात आहेत. तर अन्य 20 मतंही राणेंना सहकार्य करतील असं मानलं, तर ही संख्या 142 (122+20) वर जाते.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेची निर्णायक मतं
या घडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मिळून 83 इतकं संख्याबळ होते.
त्याला शिवसेनेच्या 63 आमदारांची रसद जोडल्यास ते संख्याबळ 146 (83+63) पर्यंत जातं.
अदृश्य हात मदतीला धावतील?
नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रात मते फुटली होती. भाजपच्या मदतीला अदृश्य हात आले होते. ते हात यावेळी नारायण राणे यांच्यासाठी पुढे येतील का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते एकत्र बसून, यावर चर्चा करतील आणि भूमिक ठरवतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. शिवाय, शिवसेनेने आता सत्तेसोबत की सत्तेशिवाय, यावर निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले.
नितेश राणे आणि कोळंबकरांची मतं राणेंना?
दरम्यान, नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे आणि कट्टर समर्थक कालिदास कोळंबकर अशी दोन मते राणेंच्या पारड्यात पडण्याची शक्यता अधिक आहे.
काँग्रेस, सेना राणेंच्या विरोधात, राष्ट्रवादीच्या भूमिकेला महत्त्व
नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात प्रवेश होऊ नये म्हणून शिवसेनेनं आधीच ताठर भूमिका घेतली आहे. नारायण राणे यांनी काँग्रेस सोडताना अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस तरी राणे विरोधात जोर लावणार, असं असताना राष्ट्रवादी पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे नेहमीच संशयाने पाहिले जाते. सध्या तरी या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे.
राजकारणात राणेंचे मित्र कमी, शत्रू जास्त
राजकारणात नारायण राणे यांनी मित्र कमी शत्रू जास्त बनवले आहेत. त्यामुळे नारायण राणे जर ही निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या विरोधातील सगळेच शत्रू एकत्र यायची शक्यता नाकारता येत नाही.
राणेंना दगाफटका होण्याची शक्यता
भाजपच्या गोटातही नारायण राणे यांच्या बाबत फारसं ममत्व नाही. त्यामुळे नारायण राणे यांनी ही निवडणूक लढवली तर दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2014 विधानसभा निवडणूक, त्यानंतर वांद्रे पोटनिवडणूक या दोन निवडणुकीत पराभवाला समोर गेलेल्या नारायण राणे तिसऱ्यांदा पुन्हा अशा अटीतटीच्या निवडणुकीला सामोरं जातील का, त्यांना कुणकुणाची साथ मिळेल? या निवडणुकीच्या निमित्ताने काय राजकीय डाव खेळले जातील याकडे आता सगळ्याच लक्ष लागून आहे.