Anil Jaisinghani ED Action : क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानीला अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement) म्हणजेच ईडीनं (ED) दणका दिला आहे. अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याची 3.40 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त (Property Seized) करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ED) याबाबत माहिती देताना शनिवारी जाहीर केलं आहे की, अनिल जयसिंघानीची 3.40 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) म्हणजे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित गुजरातमधील क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानीच्या मालकीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.


अनिल जयसिंघानीची मालमत्ता ईडीकडून जप्त 


बुकी अनिल जयसिंघानी विरोधात ईडीने आरोपपत्रही दाखल केलं असल्याची माहिती दिली आहे. गुजरातमधील वडोदरा पोलीस ठाण्यात 2015 मध्ये नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान, जयसिंघानी हा क्रिकेट सट्टेबाजीच्या क्रियाकलापांमध्ये गुंतलेला होता, असल्याचं समोर आलं आहे. तसेच मारुती-अहमदाबाद या सट्टेबाजीच्या प्रकरणामध्ये गुंतलेल्या संस्थेशी संबंधित व्यक्तींच्या मदतीने फसवणुकीच्या माध्यमातून त्याने मोठ्या प्रमाणात पैसे जमा केल्याचंही तपासात उघड झालं आहे.


जयसिंघानी तपासात सहकार्य करत नाही


अनिल जयसिंघानी 2015 पासून ईडीचे समन्स टाळत आहे. 2015 मध्ये विशेष पीएमएलए (PMLA) कोर्टाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी करूनही तो PMLA तपासात सहकार्य करत नाहीय. त्याला 8 एप्रिल 2023 रोजी ईडीने अटक केली होती आणि त्यानंतर अहमदाबादमधील पीएमएलए कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.


जयसिंघानीची 3.40 कोटी किमतीची स्थावर मालमत्ता जप्त


ईडीने 9 जून रोजी जयसिंघानीच्या ओळखी असलेल्या परिसरात छापा टाकला. ईडीने आता जयसिंघानीची 3.40 कोटी किमतीची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे, ही जयसिंघानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. याव्यतिरिक्त, ईडीने 6 जून रोजी अहमदाबाद येथील विशेष पीएमएलए न्यायालयासमोर आरोपी जयसिंघानीविरुद्ध फिर्यादी तक्रार दाखल केली.


अनिल जयसिंघानीचं मॅचफिक्सिंग नेटवर्क उघडकीस


क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याचे 15 हजार कोटींचे मॅच फिक्सिंग नेटवर्क याआधीच पोलीस तपासात उघड झालं आहे. या मॅच फिक्सिंग नेटवर्कमध्ये अनेक क्रिकेटपटू, आयपीएल फ्रँचाईसी (IPL), मालक आणि पोलिसांचा (Police) समावेश असल्याची चर्चा आहे. भ्रष्टाचार, ब्लॅकमेलिंग, मॅचफिक्सिंग आणि हवालाचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पाकिस्तान आणि दुबईतील क्रिकेट बेटिंग कार्टेलशी संबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.