मुंबई : घरात पूजा, लग्न किंवा कोणताही सण असो... भल्या पहाटे दादर गाठून फुलं आणली नाहीत असा मुंबईकर सापडणं तसं कठीणच. मात्र दादर स्थानक परिसरातील फुल विक्रेत्यांच्या व्यवसायावर लवकरच गदा येणार आहे. दादर स्टेशनच्या 150 मीटर आवारात फुलांची विक्री करण्यासही मुंबई उच्च न्यायालयाने आता बंदी घातली आहे.
फुल विक्रेत्यांमुळे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी होऊ नये, यासाठी 150 मीटर आवारात फुलं विकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे स्थानकाजवळील फुल विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
फेरीवाल्यांमुळे रेल्वे स्थानक परिसरात उगाच गर्दी होऊ नये, तसेच प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने 150 मीटरच्या परीसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास याआधीच बंदी घातली होती. रेल्वे कायद्यानुसारही स्थानक परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. असं असतानाही दादर स्थानकाजवळ भल्या पहाटेपासून अनेक विक्रेते आढळून येतात.
दादर हे पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारं एक महत्त्वाचं स्थानक असून या ठिकाणी दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. त्यामुळे या परिसरात फुलं विक्री करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बॉम्बे हॉकर्स असोसिएशनच्या वतीने आज हायकोर्टात करण्यात आली.
न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने या व्यावसायिकांना दिलासा देण्यास नकार देत दादर स्थानकापासून 150 मीटर परिसरात फुल विक्री करु नये असे आदेश दिले आहेत.