पश्चिमसोबतच मध्य रेल्वेसाठीही येत्या वर्षात नवीन सहा एसी लोकल
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 03 Jan 2019 08:25 PM (IST)
कायम सेकंड हँड लोकल मिळत असल्याची मध्य रेल्वेवरील प्रवाशांची रडरड आता थांबेल, कारण येत्या वर्षात बारा लोकल मुंबईत दाखल होत असून त्यापैकी सहा नव्या कोऱ्या लोकल मध्य रेल्वेवर धावतील
मुंबईकरांच्या सेवेत दुसरी एसी लोकल दाखल होत आहे. नवीन एसी लोकलचं आज आयसीएफमध्ये उद्घाटन करण्यात आलं.
मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या वर्षात मध्य रेल्वेला सहा नव्या एसी लोकल मिळणार आहेत. मध्य रेल्वेवर कायम अन्याय होत असल्याची प्रवाशांची भावना, या निमित्ताने दूर होईल. येत्या वर्षात मुंबईत 12 एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यांची समसमान वाटणी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर होणार आहे. म्हणजेच सहा लोकल मध्य, तर सहा लोकल पश्चिम रेल्वेला देण्यात येणार आहेत.