मुंबई : खोट्या कागदपत्रांच्या आधारे महानगरपालिकेमध्ये गेल्या 28 वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात जुलै महिन्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलीस आरोपीच्या शोधात होते. दुसर्या व्यक्तीच्या कागदपत्रांच्या आधारे काम करणाऱ्या बीएमसी कर्मचार्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
आश्चर्याची बाब म्हणजे ही कागदपत्रे ज्या व्यक्तीची होती ती व्यक्ती देखील बीएमसीमध्ये कार्यरत आहे. दोन्ही कर्मचार्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव आणि वाढदिवस हे हुबेहूब एकसारखेच आहे. जेव्हा बीएमसीने याची सत्यता तपासण्यासाठी या दोघांकडून कास्ट सर्टिफिकेटची मागणी केली तेव्हा दुसर्या व्यक्तीचे कागदपत्र वापरुन हे काम करणार्या कर्मचार्याने कामावर येण्यास थांबविले.
रमेश मारुती शेलार वय 53, हा कर्मचारी गेल्या 28 वर्षांपासून महानगरपालिकेमध्ये माळी म्हणून काम करत होता. मात्र त्याने यासाठी खोटी कागदपत्रं वापरली होती. आणि तेसुद्धा महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या एका दुसऱ्या व्यक्तीचे. गुन्ह्याची नोंद झाल्यापासून पोलीस शेलारच्या शोधात होते.
रमेश शेलार 1993 मध्ये महानगरपालिकेत माळी कामाला लागला. महानगरपालिकेमध्येच काम करणाऱ्या मारुती साबळे या व्यक्तिच्या कागदपत्रांचा वापर रमेश शेलारने महानगरपालिकेत कामाला लागण्यासाठी केला होता.
मारुती साबळे 1989 पासून महानगरपालिकेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आली की एकाच कागदपत्रांवर दोन व्यक्ती काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी या दोघांचीही कागदपत्रं मागवली. तेव्हा पासूनच रमेश शेलार ने कामावर येणं बंद केल आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा संशय बळावला. त्या नंतर महापालिकेच्या वतीनं आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला गेला.
जुन्नर तालुक्यात काम करणाऱ्या एका तहसीलदाराने शेलारला खोटे कागदपत्र दिले होते तर किशन नावाच्या व्यक्तीने त्याला महानगरपालिकेत कामाला लावल्याच त्याने पोलिसांना सांगितलं.
रमेश शेलारला अटक केल्यानंतर त्याचा खरं नाव कळलं. महानगरपालिकेमध्येच काम करत असलेल्या सोपान मारुती साबळे या कर्मचाऱ्यांची कागदपत्र वापरून तो महानगरपालिकेत कामाला लागला होता. शेलारने खोटे पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवले होते ज्यामुळे कधी त्याच्यावर संशय आला नाही. इतकंच नाही तर शेलारचे बँक अकाउंटसुद्धा मारुती साबळे याच नावाने होतं. मात्र त्यातले पैसे तो स्वतःच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा. शेलारकडे दोन पॅन कार्ड होते आणि त्याची दोन बँक खाती होती.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे तब्बल 28 वर्षे महापालिकेचा पगार घेणाऱ्या बोगस कर्मचाऱ्याला अखेर हातकड्या पडल्याच, मात्र आपला कर्मचारी बोगस आहे हे कळायला महापालिकेला तब्बल 28 वर्षे लागावी लागली हेच नवल.
महत्वाच्या बातम्या :
- US Plane Inside Pics: विमान आहे की 'वडाप'; जीव वाचवण्यासाठी अमेरिकेच्या विमानात शिरले तब्बल 800 जण
- Exclusive : सार्वजनिक बांधकाम खात्याची कोट्यवधींची उधळण? 'या' शासकीय इमारतीच्या खर्चाचा तपशील 'माझा'च्या हाती
- नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही : विनायक राऊत