मुंबई : राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, असं असताना देखील एका शासकीय इमारतींच्या डागडुजीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आयपीएस, आयएएस आणि काही मंत्री ज्या ठिकाणी राहतात, त्या अवंती-अंबर इमारतीच्या डागडुजीसाठी तब्बल साडेआठ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार, अवंती-अंबर या इमारतीच्या छोट्यातल्या छोट्या कारणांसाठी खर्च झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर, जेवढा खर्च कागदोपत्री दाखवण्यात आला आहे, तितका खर्च तरी नक्की करण्यात आला आहे का? अशीही शंका या कामाकडे पाहिल्यानंतर उपस्थित करण्यात येत आहे.
राज्याची तिजोरी रिकामी होत असताना ती भरली कशी गेली पाहिजे? याचा विचार करायचा सोडून तिजोरी खाली करण्याचं काम काही अधिकारी करत आहेत. आयपीएस, आयएएस आणि काही मंत्री सध्या ज्या ठिकाणी वास्तव्य करतात, त्या अवंती-अंबर इमारतीवर केलेला खर्च ऐकून तुम्हीही चक्रावून जाल. या इमारतीवर तब्बल साडे आठ कोटींची फक्त डागडुजी करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या कागदपत्रानुसार, अंवती अंबर या इमारतीच्या छोट्यातल्या छोट्या कारणांसाठी मोठा खर्च करण्यात आला आहे.
अवंती-अंबर या इमारतीत अनेक बडे अधिकारी राहतात. ती इमारत अतिजिर्ण झालेली दाखवत हे काम केलं गेलं आहे. यामध्ये सर्वप्रकारची डागडुजी करण्यात आली असंल्याचं काढलेल्या बिलात म्हटलं गेलंय. प्रश्न हा आहे की, डागडुजी नेमकी कोणाच्या भल्यासाठी केली जाते? कंत्राटदार की, इमारतीतले रहिवाशी? चार-चार कोटींची बिलं काढतंय कोण? एका इमारतीवर किती खर्च करावा यासाठी काही मर्यादा असायला हव्यात की नाही? 2020 च्या अखेरीस सह्याद्री गेस्ट हाऊसच्या सिलिंगला तात्पुरती डागडुजी आणि रंगरंगोटी करण्यात आली. यासह सह्याद्री गेस्ट हाऊसच्या संपूर्ण याच कामाचे बील तब्बल दीड कोंटीपेक्षा जास्त काढण्यात आलं आहे.
एकीकडे कोरोना, वादळं, पूरपरिस्थितीमुळं सरकारचं कंबरडं मोडलं. पण दुसरीकडे मात्र सरकारच्या तिजोरीवर भार देऊन पैसै उकाळण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून केलं जातंय. याआधीही मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला. तिच कामं संपत नाहीत, तोपर्यंत सिलिंगसारखी कामं दाखवून कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचं काम सुरु झालंय का? अशी शंका सगळीकडे उपस्थित केली जात आहे.