मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कोणती कारवाई करणार याकडे आता लक्ष लागलंय. अनिल देशमुख यांना उद्या हजर राहण्यासाठी ईडीनं आणखी एक समन्स बजावलं आहे. ईडीनं अटक करू नये यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिला होता. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांच्याविरोधात ईडी आता कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे. 

Continues below advertisement


सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कथित मनी लाँडरिंग प्रकरणात अटक करण्यापासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा एक अर्थ असाही होऊ शकतो की, देशमुख त्यांच्याविरोधात सुरु असलेल्या चौकशीच्या संदर्भात अटकेला सामोरे जाऊ शकतात. ईडीसमोर जाणं टाळणाऱ्या देशमुख यांना आता चौकशीला हजर राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे देशमुख यांना ईडी अटक करणार का? की शेवटचा प्रयत्न म्हणून देशमुख अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार याबाबत उत्सुकता आहे. 


अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, ईडीनं सांगितलं, देशमुखांनी नियमांचं उल्लंघन करुन कर्ज घेतले


महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत आहे. ईडीनं त्यांच्याविरोधात असलेल्या आरोपांच्या प्रकरणात चौकशीची गती वाढवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ईडीला देशमुख यांच्या चौकशीत काही महत्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. देशमुख यांनी खाजगी बँकांकडून नियमांचं उल्लंघन करुन कर्ज घेतलं आहे.  


नियमांचं उल्लंघन करुन लोन पास करण्यासाठी देशमुख यांनी मदत केली होती का, याबाबत देखील ईडी तपास करत आहे. ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार देशमुख यांनी या लोन मिळालेल्या रकमांना अशा कंपन्यांना ट्रान्सफर केलं ज्या कंपन्यांवर देशमुख यांच्या कुटुंबियांची मालकी आहे. ईडी सूत्रांनी सांगितलं की, या कंपन्यांची चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की, यापैकी काही कंपन्या खऱ्या आहेत तर काही शेल कंपन्या आहेत. ईडी आता चौकशी करत आहे की, या लोन घेतलेल्या पैशांचं पुढं नेमकं काय झालं. 


अनिल देशमुख यांचे अटक झालेले स्वीय सचिव  संजीव पलांडे यांनी आधीच ईडीला कबुली दिली आहे की पोलीसांच्या बदल्यांमध्ये खासकरुन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हात होता. परमबीर सिंह यांनी 4 मार्चला ज्ञानेश्वरी इथे झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे आरोप आपल्या तक्रारीमध्ये केला होता. ती बैठक झाल्याची कबुली देखील पलांडे यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


अनिल देशमुख प्रकरणातील कागदपत्र मागण्यासाठी गेलेल्या अधिकऱ्याला एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यानं धमकावलं, सीबीआयची हायकोर्टात तक्रार