मुंबई : भाजपाच्या वतीने नव्याने केंद्रात मंत्री झालेल्या नेत्यांची जन आशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना भाजपने मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी दिल्या नंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ज्या ठिकाणी नाराय़ण राणे शिवसेनेच्या विरोधात उभे राहतात त्या त्या ठिकाणी शिवसेनेचाचं विजय होतो. नारायण राणेंच पानिपत करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये त्यावेळेस जबरदस्त निर्माण होते. त्यामुळे भाजपने नारायण राणेंना मुंबई महानगरपालिका द्या, ठाणे महानगर पालिका द्या नाहीतर अन्य काही द्या. मात्र शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्या शिवाय राहणार नाही.
आपल्या मुंबईच्या दौऱ्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. मात्र नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. नारायण राणे सारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी ज्याने बेईमानी केली असा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट शिवसैनिक देऊ देणार नाहीत. शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत यांची नारायण राणेवर टीका.
नारायण राणे यांच्या खांद्यावर मुंबई महापालिका, वसई-विरार महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय कोकणाची धुराही राणे यांच्या खांद्यावर असेल. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने नारायण राणे तब्बल दोन दिवस मुंबईसाठी देणार आहेत.
नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेची वैशिष्ट्य
जन आशिर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं दर्शन घेतील.शिवाय चैत्यभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचंही दर्शन घेणार आहेत.शिवसेनेच्या बालेकिल्ल्याच्या परिसरात नारायण राणेंची यात्रा जाईल, याची विशेष खबरदारी भाजपने घेतली आहे. गेल्या 30 वर्षांपासून मुंबईत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. भाजपच्या 'मिशन मुंबई महापालिके'च्या दृष्टीने ही यात्रा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एवढंच नाही तर वसई विरार या पट्ट्यातही नारायण राणे यांची यात्रा जाणार आहे. मराठी मतं जोडताना उत्तर भारतीय मतं आपल्यापासून दूर जाणार नाहीत याची खबरदारीही भाजपने घेतली आहे.