मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाची घोटाळेबाज आणि काळ्या यादीतल्या कंपन्यांवरील मर्जी काही केल्या कमी होताना दिसत नाही. काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराच्या दुसऱ्या कंपनीला काम दिले जात असल्याच्या कारणास्तव स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र तरी देखील पुन्हा त्याच कंपनीला काम देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु झाला आहे.

गोराई कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलून तो डंम्पिंग ग्राऊंडपर्यंत नेण्याच्या कामासाठी  7 कोटी 95 लाखांचा प्रस्ताव आहे. या कामाचे कंत्राट मिळालेल्या कविराज एमबीबी कंपनीचे संचालक आणि भागदारक हे नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी काळ्या यादीत टाकलेल्या जैन कुटुंबीयांच्या कंपनींतील आहेत.

महापालिकेनं मात्र कायदेशीर सल्लागारावर 4 लाख रुपये खर्च करुन तीन वेळा सल्ला मागवून संबंधित कंपनी काळ्या यादीतील कंपन्यांशी संबंधित नसल्याचे प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे.