मुंबई : हनुमान चालीसा वाचनावरुन राज्यभरात रान उठवणाऱ्या राणा दाम्पत्यामुळे मुंबईतील लाव्ही या इमारतीतील इतर रहिवाशांना मनस्ताप होत आहे. खार परिसरातील लाव्ही या इमारतीच्या आठव्या मजल्यावर आमदार रवी राणा यांचा फ्लॅट आहे. फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी राणा यांना महापालिकेने नोटीस बजावलेली असतानाच आता या इमारतीमधील इतर आठ रहिवाशांनाही महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे.


आमदार रवी राणा यांचा मुंबईतील फ्लॅट असलेल्या इमारतीत आज (30 मे) दुपारी मुंबई महापालिकेचं पथक दाखल झालं आहे. या इमारतीत अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका महापालिकेने ठेवला असून त्यासाठी पालिका अधिकारी इमारतीमध्ये दाखल झाले आहेत. याच प्रकरणी या इमारतीमधील इतर आठ रहिवाशांनाही महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राणा दाम्पत्याच्या घरासह इमारतीमधील इतर घरांमध्ये अनधिकृत बांधकाम आहे की नाही याची पाहणी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.


बीएमसी अधिकाऱ्यांकडून इमारतीतील फ्लॅट्सचे मोजमाप सुरु करण्यात आलं आहे. राणा दाम्पत्य राहत असलेल्या लाव्ही या इमारतीचं संपूर्ण निरीक्षण केलं जाणार आहे. ज्यात इमारतीतील कोणत्या भागात अनधिकृत बांधकाम केलं आहे, सोबतच कुठे अनधिकृत बांधकाम केलं आहे का? याची पाहणी आणि निरीक्षण महापालिका अधिकारी करत आहेत.


राणा दाम्पत्याला उत्तर देण्यासाठी एक महिन्याची मुदत
दरम्यान, याआधीही बीएमसीच्या पथकाने राणा दाम्पत्याच्या या घराची पाहणी केली होती. यानंतर राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. खार परिसरात लाव्ही इमारतीच्या आठव्या मजल्यावर रवी राणा यांचा फ्लॅट आहे. रवी राणा यांनी त्यांच्या घरात मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त काही अंतर्गत बदल केलं आहे. या घराची बाल्कनी वाढवली आहे. याच वाढीव बांधकामावर मुंबई महापालिकेने आक्षेप घेतला घेत नोटीस बजावली आहे. त्यानुसार 4 मे रोजी महापालिकेचं पथक राणा दाम्पत्याच्या घरी दाखल झालं होतं. घराची पाहणी करुन त्याच्या अहवाल सादर करण्यात आला. त्या अनुषंगाने राणा दाम्पत्याला आणखी एक नोटीस बजावण्यात आली. याविरोधात राणा दाम्पत्य कोर्टात गेलं. या नोटीसला उत्तर देण्यासाठी राणा दाम्पत्याला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.