मुंबई: शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेले 'पेंग्विनकारण' आता अधिक तापण्याची शक्यता आहे. मुंबईनंतर गुजरातमध्ये पेंग्विन पार्क सुरू झालं असून त्या पार्कला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी भेट दिली आहे. गुजरातच्या पार्कमधील पेंग्विनची नावं ही आफ्रिकन असल्याची माहिती पेडणेकरांनी एका ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे पेंग्विनवरुन सुरू असलेलं राजकारण संपण्याची चिन्हं नाहीत. 


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी आज गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणच्या पेंग्विन पार्कला भेट दिली. या पार्कमध्ये एकूण पाच पेंग्विन असून त्यांची नावं ही सिमोन, पुंबा, नेमो, मुशू आणि स्वेन अशी आहेत. ही सर्व नावं आफ्रिकन असल्याचंही किशोरी पेडणेकरांनी आवर्जून सांगितलं आहे. 


 






या आधी मुंबईतील पेंग्विनचं नाव हे ऑस्कर ठेवल्याने त्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टीका केली होती. मराठी पाट्यांचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेला पेंग्विनचं नाव मराठीत ठेवता आलं नाही का? असा सवाल चित्रा वाघ यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना केला होता. त्यावर उत्तर देताना महापौर किशोरी पेडणेक म्हणाल्या होत्या की, "राणीच्या बागेतील पेंग्विन हा मुंबईकरच आहे, ऑस्कर नावाला आक्षेप घेणाऱ्या बोलक्या बाहुलीचा पक्ष तिकडे गोव्यात त्यांच्या भाऊबंधांकडे मतांची भीक मागत फिरतायेत. मुंबईत एक भूमिका आणि गोव्यात एक भूमिका अशी भाजपची दूतोंडी भूमिका आहे."  


पेंग्विनवरुन पुन्हा राजकारण तापणार
मुंबईत राणी बागेतील कंत्राटे आणि पेंग्विनकरता होणाऱ्या खर्चावरुन भाजपने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. मात्र, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत: अहमदाबादेतील सायन्स सेंटरच्या पेंग्विन कक्षाला भेट देऊन अनेक महत्वाचे मुद्दे समोर आणलेत. राणीबागेतील पेंग्विन पहाण्याचा  तिकीट दर 25 ते 50 रुपये आहे तर अहमदाबादेतील पेंग्विन पहाण्याकरता 300 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे आता राणीबागेचे पेंग्विन आणि अहमदाबादेचे पेंग्विन अशी तुलना सुरु झाली आहे.


संबंधित बातम्या: