मुंबई : महापालिकेच्या महसुलात दिवसेंदिवस घट होत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने महत्वाची मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरु केली आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून मालमत्ता कर न भरणाऱ्या विमान कंपनीची दोन हेलिकॉप्टर पालिकेने जप्त केली आहेत. या जप्तीचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वागत केले आहे.

महापालिकेला जकात करामधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत होता. जकात कर रद्द होऊन त्याची जागा जीएसटी कराने घेतली आहे. जीएसटीच्या माध्यमातून पालिकेला राज्य सरकारकडून कमी प्रमाणात परतावा मिळत आहे. यामुळे पालिकेने महसूलवाढीसाठी नवीन स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी एक मालमत्ता कर आहे. मालमत्ता कर वेगाने वसुलीसाठी पालिकेने कंबर कसली आहे. मात्र तरीही अद्याप 15 हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. वसुलीसाठी मोहिम राबवल्याने जमा महसूलाच्या तुलनेत जवळपास 84 टक्के इतकी वाढ झाली आहे.

राज्य सरकारच्या नियमानुसार 500 चौरस फुटापर्यंतच्या निवासी सदनिकांना मालमत्ता करात सूट दिल्याने 335 कोटीने महसूल कमी झाला आहे. मात्र मालमत्ता कराची कमी प्रमाणात वसुली होत असल्याने पालिकेने कर थकवणाऱ्यांवर जप्तीची कारवाई सुरु केली आहे. मेस्को एअरलाईन्स या विमान कंपनीने पालिकेच्या मालमत्ता कराची तब्बल 1 कोटी 64 लाख 83 हजार 658 इतकी रक्कम थकवली आहे. नियमानुसार पाठपुरावा करूनही विमानकंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने आज पालिकेने या कंपनीची दोन हेलिकॉप्टर जप्त केली आहेत.

महापौरांकडून जप्तीचे समर्थन

पालिका कर वसुलीसाठी जप्तीची कारवाई करत आहे याचा अर्थ तिजोरीला गळती लागली असा होत नाही. पालिकेचे अनेक मोठे प्रकल्प सुरु आहेत. त्यासाठी निशी लागतो. प्रकल्प पूर्ण करणे आणि नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी महसूल येणे गरजेचे आहे. मालमत्ता कर नागरिकांनी प्रामाणिकपणे भरला पाहिजे. कर भरला नाही तर सक्ती करावी लागेल. जकात कर रद्द झाल्याने पालिकेला नवीन उत्पन्नाचे स्रोत शोधावे लागत आहेत. त्या उत्पन्नांचे स्रोत मिळाले आहेत. त्यामुळे कर वसुलीसाठी कारवाई करावी लागत असल्याचे सांगत महापौर किशोरी पेडणेकर यांनी जप्तीचे समर्थन केले आहे.

BMC Tax | मुंबईकरांना भविष्यात 'कचरा टॅक्स' भरावा लागणार, बीएमसीच्या अर्थसंकल्पात सूतोवाच



संबंधित बातम्या : 

मालमत्ता कर वसूलीसाठी पालिकेची दवंडी, पुढच्या आठवड्यापासून जप्तीची कारवाई

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील 24 तास 15 टक्के पाणीकपात