मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. म्हणजेच जवळपास 9 महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. परंतु आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कोरोनाचं कारण सांगत मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. तर फेब्रुवारीत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात नसेल तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक वेळेत होईल. परंतु कोरोनाची परिस्थिती जर नियंत्रणात नसेल तर निवडणुका पुढे ढकलण्यात येईल.
पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई महापालिका निवडणूक अपेक्षित आहे.. कोरोनाची रुग्ण संख्या कमी असल्यास महापालिकेची निवडणूक घेण्यासाठी महापालिका ठाम आहे. राज्य निवडणूक आयोगाने देखील निवडणूक तयारीसाठी महापालिकेला काम करायला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू. पी. एस. मदान, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि संबंधित अधिकारी यांची ऑनलाईन बैठक काल पार पडली.
यावरून राजकारण मात्र सुरू झाले आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यात राज्यात आता महाविकास आघाडी सरकार असून मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. 2019 विधान सभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणूक चुरशीची होणार आहे.
राज्यात आधीच कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, कोल्हापूर, मीरा- भाईंदर, विरार या महापालिका निवडणुका कोरोनामुळे प्रलंबित राहिल्या आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये दहा महापालिका निवडणुका त्यात ही मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे जाणार ही चर्चा सुरू झाली आहे.
संबंधित बातम्या :