मुंबई : पावसाची सुरुवात होण्याच्याच काळात दरवर्षी कोळी बांधव मात्र त्यांची गलबतं माघारी घेण्याच्या गडबडीत दिसतात. यंदाच्याही वर्षी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अन्वये 1 जून ते 31 जुलै या साधारण दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मासेमारी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील आठवड्यातच हे आदेश देण्यात आले. याच धर्तीवर आता कोळी बांधवांनी त्यांची गलबतं समुद्रातून माघारी आणण्यास सुरुवात केली. 


सिंधुदुर्गातील सागरी हद्दीत मासेमारी बंद 


आजपासून 31 जुलै पर्यत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत मासेमारी बंदी करण्यात आली आहे. मच्छ विभागाच्या धोरणानुसार ही बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असले. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बिजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. 


मुंबईतील किनाऱ्यांवर सुरु राहणार मासेमारी 


महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियम 1981 अन्वये मासेमारीवर काही काळासाठी निर्बंध येणार असले तरीही मुंबईतील कुलाबा भागातील किनारपट्टीमध्ये 12 सागरी मैलांपर्यंत पारंपरिक पद्धतीने कोळी बांधव मासेमारी करु शकणार आहे. ब्रिटीश काळापासून सुरु असणारी ही मासेमारी मात्र थांबणार नाही. कुलाबा कोळीवाडा आणि तत्सम भागांमध्ये या मोसमात मासेमारीचा अधिक वाव असतो, अशी माहिती दर्यावर्ती महिला संघाच्या अध्यक्षा राजश्री विजय नाखवा (कुलाबा) यांनी दिली. 


तोक्ते चक्रीवादळामुळे कोळी बांधवांना फटका बसल्याचं सांगत सध्याच्या घडीला अनेक गलबतं किनाऱ्यावर आल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. येत्या काळात मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आणि इतर बादारपेठांमध्ये येणारी बहुतांश मासळी ही ओडिशा आणि कोलकाता येथून आलेली असेल, अशीही माहिती त्यांनी दिली. सदर भागात मार्च- ते एप्रिल दरम्यान, मासेमारीच्या नियमांवर निर्बंध असतात. पण, ज्यावेळी महाराष्ट्रात मासेमारी बंद असते तेव्हा मात्र याच भागांतील मासळी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते अशीही महत्त्वपूर्ण माहिती राजश्री नाखवा यांनी दिली. 


आमच्या जमिनी बळकावण्यासाठी भूमाफियांचा आम्हांला मासेमारी करू न देण्याचा डाव, जुहू चौपाटीवरील कोळीबांधवांचा आरोप


तर गलबत आणि मासळी होणार जप्त... 


सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र पारंपारिक पद्धतीने मसेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिकी मासेमारी नौकांस याकालावधीत मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियम 1981, कलम 14 अन्वये असे गलबत जप्त करण्यात येऊन त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल, तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शिक्षा लागण्यात येईल.